कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस दूध खरेदी दरात प्रतीनुसार प्रतिलिटर एक ते दीड रुपयांची वाढ तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपातीचा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली. उद्या, रविवार पासून याची अंमलबजावणी होणार असून दूध विक्री दराबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. म्हैस दूध ५.५ ते ६.४ फॅट व ९.० एस. एन. एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर एक रुपयांनी तर ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर दीड रुपये दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. राज्यातील खासगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. बाजारपेठेतील दुध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले असून याबाबींचा विचार करुन गाय दूध खरेदी दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
Kolhapur: ‘गोकुळ’च्या म्हैस दूध खरेदीत दीड रुपयांची वाढ, गाय खरेदी दूधात केली कपात
By राजाराम लोंढे | Published: September 30, 2023 5:50 PM