केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (जुना एन.एच.फोर) म्हणजेच सध्याचा महामार्ग क्रमांक ४८च्या रुंदीकरण व देखभाल व्यवस्थेसाठी गोकुळ शिरगाव गावाच्या हद्दीतील जमिनी व गावठाण मिळकती संपादित करण्याकामी अधिसूचना जाहीर केली होती. त्यावर म्हणणे मांडण्यास संदर्भात २१ दिवसांची मुदत दिली आहे. त्याला अनुसरून गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे यासंदर्भात गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांसह मिळकतधारकांची बैठक झाली. या बैठकीत महामार्ग रुंदीकरणाला विरोध न करता प्रस्तावित भूमी संपादन प्रक्रिया याचा फेरविचार करण्याबाबत एकमत झाले.
त्याप्रमाणे सुदर्शन पेट्रोल पंपपासून एम. आय. डी.सी. फाट्यापर्यंत हायवेचा ओव्हरब्रीज करण्यासंदर्भात मागणी करण्याचे एकमताने ठरले. यासाठी अतिरिक्त भूसंपादनाची गरज नसल्याचे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले.
ओव्हर ब्रीजमुळे हायवेची वाहतूक परस्पर वरून होईल. शिवाय शासनाची भूमी संपादनाची रक्कमही वाचेल. तसे निवेदन राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय व भूमी संपादन अधिकारी सातारा यांना देण्याचे ठरले. तसेच यासंदर्भात गावठाण बचाव कृती समिती स्थापन करून या समितीच्या अध्यक्षपदी लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील आणि कार्यवाह म्हणून नारायण पोवार यांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये भूमी संपादन अधिकाऱ्यांनी योग्य प्रतिसाद न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचे ठरले. यावेळी संपादित मिळकतधारक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.