लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) जुना पुणे-बंगलोर महामार्गावरील शॉपीमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत ६३ लाख ४७ हजारांचा अपहार करणारा अमित अशोकराव पवार (राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी) याच्यावर अखेर रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल करण्याची चाहूल लागताच पवार पसार झाला.अमित पवार हा ‘गोकुळ’च्या शॉपीत लिपिक कम शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होता. शॉपीतून रोज दूध व दुग्धजन्य पदार्थांची लाखो रुपयांची रोखीने विक्री होते. त्याचा फायदा घेऊन पवार याने एप्रिल २०१६ ते १४ जुलै २०१७ अखेर वेळोवेळी पैशांवर डल्ला मारल्याचे निदर्शनास आले. याचे सनदी लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी लेखापरीक्षण केले. त्यामध्ये त्याने ६३ लाख ४७ हजार ९३३ रुपये ७९ पैशांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले.पवार हा राधानगरी तालुक्यातील संघाच्या माजी संचालिकेचा मुलगा असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला; पण अपहाराचा आकडा वाढत गेल्याने वसुलीसाठी संघाने त्याच्याकडे तगादा लावला. हे प्रकरण निदर्शनास येऊन दीड महिन्याचा कालावधी झाला तरी संबंधितांवर कारवाई होत नसल्याने शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने सहायक निबंधक (दुग्ध) यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. रविवारी संघाचे मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी सदाशिव श्रीपती पाटील (हिरवडे खालसा, ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पवार याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.अटकपूर्वसाठी प्रयत्नगुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अटक करणार; ही कुणकुण पवार यास लागताच तो पसार झाला. त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
‘गोकुळ शॉपी’ अपहार; अमित पवारवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:37 AM