लोकमत न्यूज नेटवर्क
यवलूज : गेल्या महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीने आलेल्या महापुरात जिल्ह्यातील सर्वच नदीकाठची शेती पाण्याखाली गेली. दहा ते बारा दिवस ऊस, भात, गवताळ कुरणे व इतर पिके पाण्याखाली राहून कुजली. परिणामी जनावरांच्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला. अशा परिस्थितीत दूध उत्पादकांना जनावरांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. जादा दराने वैरण विकत घ्यावी लागते. कोरोनामुळे तरुण पिढीच्या नोकऱ्या गेल्याने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. ओल्या चाऱ्याची टंचाई व पशुखाद्याच्या वाढलेल्या दरामुळे दूध धंदा परवडत नाही. गोकुळ दूध संघाने पशुखाद्य दर कमी करावेत अशी मागणी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दालमिया परिसर अध्यक्ष दगडू गुरवळ व यांनी केली आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र खोत, अमृतराज रणदिवे, शिवाजी खोत,किरण यादव, बाबासो रणदिवे, दिंगबर खोत, निलेश पाटील, धनाजी चोरगे, चंद्रकांत खडके, कोमल चोरगे, रेखा यादव यांच्यासह अन्य दूध उत्पादकांनाच्या सह्या आहेत.