लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी उद्या, रविवारी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाचे साहित्य आज, शनिवारी दुपारी तहसीलदारांच्या माध्यमातून केंद्रावर पोहोच केले जाणार आहे.
‘गोकुळ’च्या मतदानाची तयारी पूर्ण आली असून शुक्रवारी केंद्रावर लागणारे साहित्याचे पॅकिंग करून ठेवले आहे. तालुक्यातील ७० केंद्रांवर हे साहित्य आज, दुपारी पोहोच केले जाणार आहे. सकाळी आठपासून मतदान होणार असून साधारणत: एका केंद्रावर ५० मते होणार आहेत.
दरम्यान, मंगळवारी (दि. ४) मतमोजणी होत आहे. त्यासाठीच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शुक्रवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हाॅल येथे पूर्ण झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून मतमोजणी प्रतिनिधींची संख्याही मर्यादित ठेवण्यात आली आहे. एका टेबलवर दोन्ही पॅनलचेच प्रत्येकी दोन असे चार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
एका केंद्रावर चार कर्मचारी
केंद्राची संख्या वाढल्याने मतदानाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एका केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मतदारांना मास्क, कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड
निवडणूक यंत्रणेने प्रत्येक मतदाराला मास्क तर कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड दिले जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रावर सॅनिटायझर, हॅण्डवॉश, मास्क आदीचे किट दिले आहेत.
स्वाक्षरीसाठी मतदाराचा स्वत:चा पेन
कोरोनामुळे संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षिततेचे कडक पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदाराला स्वाक्षरीसाठी स्वत:चा पेन वापरायचा आहे. अंगठ्याला शाई लावतानाही एकमेकाचा स्पर्श होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
सात जण करणार दोन, चारवेळा मतदान
मतदारयादीत सात जणांची नावे दोन, चारवेळा आहेत. त्यांना त्याचवेळी दोन किंवा चारवेळा मतदान करता येणार आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व नाविद मुश्रीफ हे चारवेळा मतदान करतील. तर केरबा चौगुले, अशोक फराकटे, समरजीत घाटगे, आमदार राजेश पाटील, हिंदूराव पाटील
यांना दोन वेळा मतदान करावे लागणार आहे.
फोटो ओळी : ‘गोकुळ’चे उद्या, रविवारी मतदान होत असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. रमणमळा, कसबा बावडा येथील शुक्रवारी शासकीय बहुुउद्देशीय हॉलमध्ये जिल्ह्यातील ७० केंद्रांवरील साहित्य पॅकिंगचे काम होते. (फोटो-३००४२०२१-कोल-गोकुळ)