आजरा : ‘गोकुळ’मध्ये जिंकायचेच म्हणून पॅनेल तयार करायचे आहे. आजऱ्यातून ज्यांच्याकडे जास्त ठरावधारक आहेत़, त्यांना उमेदवारी दिली जाईल. अभिषेक शिंपी यांनी उमेदवारीसाठी केलेल्या दाव्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले.
शिंपी समर्थक शिष्टमंडळाने आज हसन मुश्रीफ, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यांची भेट घेऊन ‘गोकुळ’साठी आजऱ्यातून उमेदवारीची आग्रही मागणी केली.
आजरा तालुक्यात २३३ ठरावधारक आहेत. त्यापैकी शिंपी समर्थक गटाचे ८० ठरावधारक असून त्यामध्ये वाढ होईल. तालुक्यात राष्ट्रवादी, काँग्रेसची संघटनात्मक ताकद जास्त आहे. उमेदवार निवडीत शिंपी गटाला संधी मिळावी. आजपर्यंत पक्षाशी प्रामाणिक राहून काम केले आहे, अशी मागणी यावेळी जयवंत शिंपी, भिकाजी गुरव, सुरेश रेडेकर, सुभाष देसाई, विलास पाटील, शिवाजी नांदवडेकर यांच्या शिष्टमंडळाने केली.
शिंपी समर्थकांनी हसन मुश्रीफ, खासदार प्रा. संजय मंडलिक व आमदार राजेश पाटील यांची घरी, तर सतेज पाटील यांची शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे भेट घेतली व अभिषेक शिंपी यांनी ‘गोकुळ’ची उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली. आजऱ्यातील उमेदवारीबाबत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सर्व नेतेमंडळींना एकत्र करून निर्णय घेतला जाईल. ‘गोकुळ’ची निवडणूक लढायची नसून जिंकायची आहे. त्यादृष्टीने शिंपी समर्थकांनी कामाला लागावे. उमेदवार निवडीत अभिषेक शिंपी यांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याचे माजी सभापती भिकाजी गुरव यांनी सांगितले.
शिष्टमंडळात सचिन शिंपी, विक्रम पटेकर, भिकाजी गुरव, सदाशिव डेळेकर, डी. एम. पाटील, पांडुरंग जाधव, सुरेश रेडेकर, मनोहर जगदाळे, सुभाष देसाई, शिवाजी नांदवडेकर, विलास पाटील, सहदेव नेवगे, एस. पी. कांबळे होते.