गोकूळला मुंबईत सिडकोची पाच एकर जागा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 07:31 PM2021-06-03T19:31:46+5:302021-06-03T19:33:10+5:30
Gokul Milk Kolhapur : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर गेलेल्या गोकूळच्या जम्बो टिमला गुरुवारी मोठे यश मिळाले. गोकूळने मागणी केल्यानुसार मार्केटिंगसाठी नवी मुंबई, वाशी परिसरात पाच एकर जागा सिडकोकडून उपलब्ध करून दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.
कोल्हापूर : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर गेलेल्या गोकूळच्या जम्बो टिमला गुरुवारी मोठे यश मिळाले. गोकूळने मागणी केल्यानुसार मार्केटिंगसाठी नवी मुंबई, वाशी परिसरात पाच एकर जागा सिडकोकडून उपलब्ध करून दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महानंदकडून थकीत पावनेदोन कोटीही देऊ केले. प्रकल्प अनुदानासाठीचा फेरप्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने तातडीने पाठवा, अर्थखाते त्याला मंजुरी देईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोकूळ दूध संघात तब्बल तीस वर्षांनंतर घडलेल्या सत्तांतरानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील जम्बो गोकूळ टिमने गुरुवारी मुंबई दौरा केला. यात खासदार संजय मंडलिक, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक शशिकांत चुयेकर, बयाजी शेळके, बाबासो चौगले, कर्णसिंह गायकवाड, रणजित पाटील, अजित नरके, अभिजित तायशेटे, एस. आर.पाटील, किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे यांनी सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत गोकूळकडून मुंबईत मार्केटिंगसाठी १० एकर जागेची मागणी करण्यात आली; पण यातील पाच एकर जागा उपलब्ध होईल, असे सांगून पवार यांनी सिडकोचे अधिकारी मुखर्जी यांच्याशी तातडीने फोनवरून संपर्क साधत जागा निश्चित करण्याच्या सूचनाही दिल्या. प्रकल्प उभारणीसाठीच्या अनुदानाचा बऱ्याच वर्षांपासूनचा प्रश्नही शिष्टमंडळाने पवार यांच्या निदर्शनास आणून दिला. यावरही त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडून फेरप्रस्ताव तयार करून घ्या, पुढील तरतुदीचे मी बघतो, असे सांगून हा देखील विषय निकाली काढला.