लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मतदानासाठी चार दिवस राहिल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून ठरावधारकांची उचलाउचल सुरू केली असून, सुमारे ११०० ठरावधारक अज्ञातस्थळी आहेत. तालुक्याच्या ठिकाणचे फार्म हाऊस, रिसॉर्ट, आदी ठिकाणी ठरावधारकांना ठेवण्यात आले आहे.
‘गोकुळ’साठी रविवारी (दि. २) मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे. जिल्ह्यातील ७० केंद्रांवर ३६५० मतदान होणार आहे. एका केंद्रात ५० ते ६० मते होणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे ठरावधारकांच्या सहली थांबल्या आहेत. कोकण, गोवा, कर्नाटक, आदी ठिकाणी मतदार सहलीसाठी आठ-दहा दिवस जात होते. मात्र, यावेळेला तालुक्यातच मतदारांची व्यवस्था केली आहे. सत्तारूढ व विरोधी आघाडीने ठराव उचलले आहेत; मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत निम्मेही ठराव उचललेले नाहीत.
ज्यांच्याकडे भांडवली गुंतवणूक झाली आणि काठावर आहेत, त्यांना दोन्ही आघाड्यांकडून प्राधान्याने उचललेले आहे. कितीही दबाव आणला तर बदलू शकत नाहीत, ते त्यांच्या घरीच आहेत. सत्तारूढ गटाकडून पाचशे, तर विरोधी आघाडीकडून सहाशे असे ११०० ठरावधारक अज्ञातस्थळी आहेत. त्यांचा कोणाशी संपर्क होणार नाही, याची दक्षता दोन्ही आघाड्यांनी घेतली आहे. या ठरावधारकांना रविवारी सकाळी थेट मतदान केंद्रांवरच आणले जाणार आहे. आज व उद्या काही ठरावधारकांना उचलण्याचे नियोजन आघाड्यांचे आहे.
उद्या प्रचार थंडावणार
‘गोकुळ’साठी जाहीर प्रचार उद्या, शुक्रवारी संपणार आहे. प्रचारासाठी दोनच दिवस राहिल्याने यंत्रणा नेटाने कामाला लागली आहे.
बडदास्त पुरविताना दमछाक
ठरावधारकांची बडदास्त पुरविण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून यंत्रणा आहे. त्यांना काय हवे नको त्याची पूर्तता केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी ठरावधारकांच्या मागण्या वाढल्याने तेथील कार्यकर्त्यांची दमछाक उडताना दिसत आहे.