लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज, मंगळवारी ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास इच्छुकांची झुंबड उडणार आहे. पहिल्या दोन दिवसांत फार कमी संख्येने अर्ज दाखल झाले असून, उर्वरित कालावधीत दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.
‘गोकुळ’साठी गुरुवार (दि. २५)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी काही जणांनी अर्ज दाखल केले. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. शनिवारपासून तीन दिवस शासकीय सुट्टी होती. त्यातच होळी असल्याने त्यानंतरच उमेदवारी अर्ज भरावा, असा बहुतांशी उमेदवारांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आज, मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे. गुरुवार (दि. १)पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दाखल अर्जांची ५ एप्रिलला छाननी होणार असून, २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत आहे, तर २ मे रोजी मतदान आणि ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. होळीची सुट्टी असल्याने त्यावर कधी सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.