कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उद्या, गुरुवारपासून गाय दूध खरेदी व विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकाला ३.५ फॅटसाठी प्रतिलिटर २३ तर कार्यक्षेत्राबाहेर उत्पादकाला १८ रुपये दर मिळणार आहे. संघाने खरेदीबरोबर विक्रीदरातही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई बाजारपेठेत गाईचे दूध ४४ वरून ४२ रुपये लिटर होणार आहे. पुणे, कोल्हापूरसह इतर बाजारपेठांतील सध्याच्या दरापेक्षा दोन रुपयांची कपात होणार आहे. त्याची अंमलबजावणी उद्या, गुरुवारपासून केली जाणार आहे.
गाईचे दूध अतिरिक्त झाल्याने ‘गोकुळ’ने चार महिन्यांपूर्वी खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. उत्पादकांकडून ३.५ फॅटचे दूध २५ रुपयांनी संघ खरेदी करत होता. दूध पावडरच्या दरात वाढ होत नसल्याने संघाने पहिल्यांदा कार्यक्षेत्राबाहेर गाय दूधात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करून २० रुपयांनी दूध खरेदी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कार्यक्षेत्रातील खरेदी दरातही कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पण दूध उत्पादकांचे तीव्र पडसाद उमटतील, या भीतीने ‘गोकुळ’ने निर्णय लांबणीवर टाकला होता.
मंगळवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन कपातीचा निर्णय घेण्यात आला. पंधरा दिवसांत सीमाभागात दुसऱ्यांदा खरेदीदरात कपात केली आहे. सीमाभागातून आता प्रतिलिटर १८ रुपयांनी गाईचे दूध खरेदी केले जाणार आहे. कार्यक्षेत्रातील दूध खरेदी दरातही दोन रुपयांची कपात केली असून येथे २३ रुपयांनी खरेदी केली जाणार आहे.
अशी होणार वाढ -कार्यक्षेत्रातील दूधफॅट सध्याचा दर नवीन दर३.५ २५ रुपये २३ रुपयेकार्यक्षेत्राबाहेर दूध३.५ २० रुपये १८ रुपये
गाईच्या अतिरिक्त दुधामुळे संघाचा तोटा होत असल्याने खासगी संघांनी खरेदीत प्रतिलिटर चार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आम्हालाही नाइलाजास्तव दोन रुपयांची कपात करावी लागत आहे.- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)