कोल्हापूर : राज्यातील दूध संघांनी नोव्हेंबरपासून गाय दूध खरेदी दरात वाढ करूनही ‘गोकुळ’ने उत्पादकांना ढेंगा दाखविला होता. याबाबत ‘लोकमत’ने ४ डिसेंबरला वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर उत्पादकांमध्ये ‘गोकुळ’विषयी असंतोष पसरला होता. त्यात विरोधकांनी मोर्चाचा इशारा दिल्यानंतर नेते व संचालक मंडळ खडबडून जागे झाले आणि दोन रुपये दरवाढ जाहीर केली. बुधवार (दि. ११) पासून याची अंमलबजावणी होणार असली, तरी इतर दूध संघांच्या तुलनेत अद्याप दोन रुपये दर कमीच आहे.गाईचे दूध अतिरिक्त होऊ लागल्याने राज्यातील दूध संघांनी दूध खरेदी दरात कपात केली होती. ‘गोकुळ’ व ‘वारणा’ दूध संघांनी प्रतिलिटर २३ रुपयांनी दूध खरेदी केले. त्यानंतर दुष्काळ, महापुरामुळे दूध उत्पादनात घट होत गेली. साहजिकच दूध पावडर व बटरचे उत्पादन कमी झाले आणि देशांतर्गत बाजारपेठेत दरवाढ होत गेली.
पावडर व बटरच्या दरात किलोमागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाल्याने राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांनी नोव्हेंबरपासून गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली; मात्र ‘गोकुळ’ व ‘वारणा’ दूध संघांनी वाढ केली नाही. १ डिसेंबरपासून इतर संघांनी खरेदी दरात एक रुपयाची वाढ करत किमान २९ रुपये लिटरने खरेदी सुरू केली. तरीही ‘गोकुळ’ व ‘वारणा’ दूध संघांनी दरवाढ केली नाही.
याबाबत ‘लोकमत’ने ‘गोकुळ, वारणाकडून गाय दूध उत्पादकांच्या हातावर तुरी’ या मथळ्याखाली वृत्त दिले. त्यानंतर दूध उत्पादकांमध्ये असंतोष पसरला. विरोधकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर संघाच्या प्रशासनाने संचालक मंडळाची तातडीने बैठक घेऊन दरवाढीचा निर्णय घेतला.प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली असून, त्याची बुधवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र राज्यातील इतर दूध संघांच्या तुलनेत अद्याप दोन रुपये दर कमीच असल्याने उत्पादकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.मागील तारखेवर काढले परिपत्रक?‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दरवाढ करणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरल्याने संचालकांनी दरवाढीचा निर्णय घेतला; मात्र मागील तारखेवर परिपत्रक काढून ते संस्थांना पाठविण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे.अशी झाली दरवाढ प्रतिलिटर -फॅट गोकुळ/ वारणा राज्यातील इतर दूध संघ३.५ २७ रुपये २९ रुपये