राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’ च्या मतदानाची तारीख जशी जवळ येईल, तसे घडामोडी वेगावल्या असून ठरावधारकांची उचलाउचली सुरू झाली आहे. रविवारी करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील ठरावधारकांचे ‘स्त्राव’ घेऊन त्यांना पन्हाळ्यावर सहलीवर पाठवण्यात आले. विरोधी आघाडीकडून शंभरहून अधिक ठरावधारक उचलले असून दोन दिवसात दीडशे ठराव उचलण्याची नियोजन केले आहे. सत्तारूढ गटानेही ठराव उचलण्यास सुरूवात केली असून त्याच तालुक्यातील मोठे फार्म हाऊस, रिसॉटवर त्यांना ठेवले जात आहे.
‘गोकुळ’ची निवडणूक पाच दिवसावर आल्याने दोन्ही आघाड्यांतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे सभा, बैठकांचा धडाका सुरू असताना ठरावधारकांशी कोणाचा संपर्क येऊ नये, म्हणून यंत्रणा सक्रिय झाली आहे. ठरावधारकांना सहलीवर पाठवले जात असून विरोधी आघाडीने रविवारी ठरावधारकांना सहलीवर पाठवले. कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये स्त्राव देऊन पन्हाळ्यावर पाठवण्यात आले. एका खोलीत दोन ठरावधारकांना ठेवले असून त्यांची बडदास्त पुरवण्याची जबाबदारी काही जणांवर सोपवली आहे.
आज, न्यायालयाचा निकाल काय लागतो, हे पाहून दुपार नंतर ही यंत्रणा अधिक वेगाने सक्रिय होणार आहे. सत्तारूढ गटानेही आपल्या समर्थकांना हलवण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील मोठे फार्म हाऊस, रिसॉट आदी ठिकाणी त्यांची सहा दिवस राहण्याची सोय केली आहे. त्यांचा इतर कोणत्याही यंत्रणेशी संपर्क होणार नये याची दक्षता घेतली जात आहे. ठरावधारकांचे फोन काढून घेतले जाणार आहेत. त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीला संपर्क करायचा झाल्यास यंत्रणेतील व्यक्तीशी बोलावे लागणार आहे.
व्यक्तिगत मतासाठी यंत्रणा सक्रिय
जास्तीत जास्त ठरावधारक उचलण्याची स्पर्धा सत्तारूढ व विरोधकांमध्ये लागली आहे. मात्र सहलीवर नेलेले मतदार पॅनल टू पॅनल मते करतील, याची खात्री नसल्याने दोन्ही आघाडीच्या उमेदवारांनी व्यक्तिगत मतासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे.
महिला ठरावधारक सहलीवर जाणार
‘गोकूळ’मध्ये सुमारे साडेआठशे महिला ठरावधारक आहेत. कोरोनाची परिस्थिती त्यात महिलांची घरातील अडचणीमुळे मतदानाच्या अगोदर दोन दिवस त्यांना कुटुंबातील एका व्यक्तीसह सहलीवर पाठवण्याचे नियोजन केले आहे.