कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी दूध उद्योगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणुकीतील सत्तारूढ व विरोधी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी येथे करण्यात आली. निवडणूक अपेक्षेप्रमाणे दुरंगी झाली असून २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात राहिल्याने आता खऱ्या अर्थाने खडाखडी सुरू झाली. सत्तारूढ आघाडीने १२ विद्यमान संचालकांना व नऊ नवीन उमेदवारांना संधी दिली. विरोधी आघाडीमध्ये दोन विद्यमान व एका माजी संचालकांसह १८ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. संघाची निवडणूक येत्या २ मे व निकाल ४ मे रोजी आहे. संघाचे ३,५५० सभासद निवडणुकीचा हक्क बजावतील.
संघामध्ये काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गेली सुमारे ३० वर्षे सत्ता आहे. त्या सत्तेला काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि विधानसभेत भाजपला पाठिंबा दिलेले जन स्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी आव्हान दिले आहे. सहकारी संस्थेची निवडणूक असली तरी तिथे काँग्रेस-भाजप विरोधात महाविकास आघाडी अशी ढोबळ मानाने लढत होत आहे. सत्तारूढ आघाडीचे नाव राजर्षी शाहू आघाडी तर विरोधी आघाडीचे नाव राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी असे आहे.
सत्तारूढ आघाडीतून संघाचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे, भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांचा मुलगा दीपक, माजी आमदार संजय घाटगे यांचा मुलगा अंबरिश, काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगा धैर्यशील, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांची पत्नी अनुराधा पाटील या उमेदवारांचा समावेश आहे.
विरोधी आघाडीतून मंत्री मुश्रीफ यांचा मुलगा नविद, खासदार मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र, राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांची पत्नी सुश्मिता पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांचा मुलगा रणजित, माजी आमदार दिवंगत संजय गायकवाड यांचा मुलगा कर्णसिंह, माजी आमदार दिवंगत यशवंत एकनाथ पाटील यांचा मुलगा अमर, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा भाऊ अजित नरके यांचा समावेश आहे. सुमारे साडेतीन हजार कोटींची वार्षिक उलाढाल आणि देशभरात नावलौकिक मिळवलेला ब्रॅण्ड अशी गोकूळची ओळख आहे. या संघाची सत्ता काबीज करण्यासाठी मंत्री, खासदार, आमदारांपासून इतरही मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पॅनल घोषणेनंतर १६० जणांची माघार
पॅनल घोषणेनंतर उरलेल्या २०५ पैकी १६० जणांनी माघार घेतल्याने एकास एक लढतीचा मार्ग मोकळा झाला. सर्वसाधारण गटातून १६ जागांसाठी ३३, महिला गटातून २ जागांसाठी ५, एससी एसटीच्या एका जागेसाठी ३, ओबीसी व एनटीच्या प्रत्येकी एक जागेसाठी २ उमेदवार रिंगणात उरले आहेत. महिला गटातून वडणगेचे बाजीराव पाटील यांची पत्नी वैशाली यांची उमेदवारी राहिली आहे. अनुसूचित गटातून सत्तारूढकडून दिनकर कांबळे यांनी उमेदवारी मागितली होती, पण मिळाली नाही. त्यांनी माघार घेतली नाही. सर्वसाधारणमधून श्यामराव बेनके यांनीही माघार घेतली नाही.