कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकूळ) उत्पादकांना प्रति लिटर २ रुपये दरवाढ देणार आहे. त्याची अधिकृत घोषणा आज शुक्रवारी सत्तारूढ आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ताराबाई पार्कातील संघाच्या कार्यालयातून होणार आहे. त्यासाठी चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुधाच्या विक्री दरात तूर्त निर्णय नसला तरी मुंबईत दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई वाशी येथील गोकूळ संघाला लागूनच असलेल्या ११ गुंठे जागा खरेदीबाबत गुरुवारी बऱ्यापैकी व्यवहार पूर्णत्वास गेला असून याबाबतची निविदा प्रक्रियाबाबतही निर्णय अपेक्षित आहे. सत्तेवर आल्यास दूध उत्पादकांना लिटरमागे दोन रुपयांची दरवाढ देऊ, असा शब्द देऊन गोकूळमध्ये सत्तांतर घडल्याला दोन महिने होऊन गेले तरी आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने सत्ताधिकाऱ्यांवर नैतिक दबाव होता. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटकाळात गोकूळची घडी नव्याने बसवत असताना उत्पादकांना चार पैसे जास्त द्यायचे म्हटले तर ते कसे उपलब्ध करायचे याबाबत सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू होते. अनावश्यक खर्चांना कात्री लावण्याबरोबरच जुने ठेक्यांच्याही पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात आले. यातून कोट्यवधी रुपयांची बचत होते, असे लक्षात आल्यानंतर उत्पादकांना दूध दरवाढ देण्याच्या शब्दाचाही हिशेब तयार करण्यात आला. त्यानुसार आज दूधदरवाढीची घोषणा करण्यात येणार आहे.
चौकट
गाेकूळचा सध्या खरेदी दर
म्हैस दूध ( ६ फॅटला ३९.५० पैसे , ७ फॅटला ४४ रुपये, ८ फॅटला ४७ रुपये, १०फॅटला ५३ रुपये)
गाय दूध (३. ५ फॅटला २६ रुपये, ४ फॅटला २७. ५०पैसे, ५ फॅटला ३०. ५० पैसे)
चौकट
सिडकोकडे पाठपुरावा सुरू
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मान्य केल्यानुसार गोकूळ दूध संघाच्या प्रकल्प विस्तारासाठी मुंबईत सिडकोकडून पाच एकर जागा मिळणार आहे. त्याची शोध मोहीम सिडकोकडून सुरू आहे. आता वाशीतील जागा गोकूळ स्वत: खरेदी करणार असलेतरी सिडकोच्या जागेचा वापर कोल्डस्टोअरेजसाठी केला जाणार आहे.
चौकट
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर हे दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून होते. त्यांनी वाशी येथील सध्या गोकूळच्या प्रकल्पाला लागून असलेल्या ११ गुंठे जागेच्या व्यवहारासाठी मूळ मालकासमवेत बैठका घेऊन निर्णय घेतला आहे. आता गोकूळ ही सहकारी संस्था असल्याने नियमानुसार ठराव, टेंडर प्रक्रिया आदि बाबींची पूर्तता करून ती ताब्यात घेतली जाणार आहे.
चौकट
दहा वर्षाची सोय
वाशी येथे गोकूळचा साडेसात लाख लिटरचा वितरणाचा प्रकल्प आहे. त्याला लागूनच हैद्राबादचा मालक असलेली ११ गुंठे जागा शिल्लक होती. येथे कोल्डस्टोअरेज व पॅकिंग सेंटर उभे केले तर गोकूळचा मुंबईतील वितरणाचा पुढील दहा वर्षाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. स्वत:चे कोल्ड स्टोअरेज असेल तर ५ टक्के जीएसटीही भरावा लागणार नाही. सहकारी संस्था असल्याने खरेदीच्या व्यवहारातही सूट मिळणार असल्याने ती रक्कमही बऱ्यापैकी वाचणार आहे.