कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) शुक्रवारी झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा वादात अडकण्याची शक्यता आहे. विरोधी गटाने सभेला सहकार न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली असून मंगळवार (दि. १९) याबाबतच्या हालचाली गतीमान होणार आहेत.
‘गोकुळ’ची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगलीच गाजली. सहकार संस्थांमधील प्रघाताला फाटा देण्याचे काम संचालक मंडळाने केले. स्वागत व प्रास्ताविकानंतर संस्थेचे सचिव अथवा मुख्यकार्यकारी अधिकारी विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन करतात. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करून ताळेबंदाच्या प्रत्येक पानावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित असते.
आयत्या वेळेला उपस्थित झालेल्या प्रश्नांवर चर्चा होऊन लेखी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे संस्था प्रशासनास बंधनकारक असते. सहकार कायद्यानुसार सर्वसाधारण सभेचे कामकाज अशा प्रकारे चालणे अपेक्षित असते. पण दूध संघाच्या शुक्रवारी झालेल्या सभेत सर्व प्रघात पायदळी तुडवल्याची भावना संस्था प्रतिनिधीमध्ये पसरली आहे.
व्यासपीठावर अध्यक्षांसह संचालक व अधिकारी असताना नेत्यांनी अहवाल हातात घेऊन मंजूर म्हणणे संयुक्तीक नसल्याची चर्चा शनिवारी दिवसभर सहकार क्षेत्रात सुरू होती.याच मुद्यावर विरोधक आक्रमक झाले असूनगडबड अंगलट आली!
‘गोकुळ’चा ताळेबंद पाहिला तर निश्चित सक्षम आहेच. एवढा मोठा कारभार करताना थोड्या उणीवा राहणार हे संस्था सभासदांनाही माहिती आहे. त्यामुळे विषय निहाय चर्चा करून सभा जिंकणे सत्तारूढ गटाला सहज शक्य होते. पण नेत्यांनी केलेली गडबड संचालकांच्या चांगलीच अंगलट आली.