कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांच्या उत्पादकांना यावर्षी तब्बल ५५ कोटी दूध दर फरक देणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली. पन्हाळा-गगनबावडा तालुक्यातील दूध संस्थांच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आयोजित केलेल्या संपर्कसभेत ते बोलत होते. दूध संस्थांचे दैनंदिन कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत या सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये संस्था प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना अध्यक्ष पाटील म्हणाले, यावर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्पादकांना ५५ कोटी रुपये दूध दर फरक देणार आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक फरकाची रक्कम असून ‘गोकुळ’ने सातत्याने दूध उत्पादक शेतकऱ्याचे हित डोळ्यासमोर ठेवूनच कारभार केला आहे. त्यामुळेच उत्पन्नातील जास्तीत जास्त वाटा हा शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा प्रामाणिक प्रयत्न संघ करत आहे. २०१४-१५ एप्रिल २०१५ ते मार्च २०१५ या कालावधीमध्ये संघास दूध पुरवठा केलेल्या दुधास हा फरक देण्यात येणार आहे. म्हैस दुधास प्रतिलिटर १ रुपये ९५ पैसे तर गाय दुधास १ रुपये ५ पैसे फरक देण्यात येणार आहे. त्यातून प्रतिलिटर २० पैसे संस्थांच्या नावावर डिबेंचर्स ठेवपोटी संघाकडे जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दूध संस्था सचिव व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनात्मक जादा दर म्हणून प्रतिलिटर ४० पैसेप्रमाणे दहा दिवसांच्या बिलातून आदा केलेली आहे. त्याची रक्कम ११ कोटी ५० लाख रुपये इतकी होते. आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय आगामी काळात घेऊ, अशी ग्वाही अध्यक्ष पाटील यांनी दिली. ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी स्वागत केले. विश्वास जाधव यांनी आभार मानले.
गोकुळ’चा ५५ कोटींचा दूध दर फरक : पाटील
By admin | Published: September 15, 2015 1:06 AM