लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनचा फटका दूध व भाजीपाला वितरणाला बसला आहे. ‘गोकुळ’ दूध संघाची शनिवारची दूध विक्री तब्बल ८० हजार लिटरने घटली आहे, तर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ २० टक्केच भाज्यांची आवक झाली. त्याचबरोबर भाजीमंडई, आठवडी बाजार बंद राहिल्याने भाज्यांचा उठावही थंडावला असून, समितीची सुमारे तीन कोटींची उलाढाल ठप्प झाली.
वीकेंड लॉकडाऊनमधून दूध, भाजीपाल्यासह अत्यावश्यक गोष्टींना वगळण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊनचा कमी-अधिक प्रमाणात या गोष्टीवर परिणाम झाला आहे. दूध संकलन व त्याची वाहतूक सुरळीत झाली. मात्र, विक्रीला फटका बसला, ‘गोकुळ’ दूध संघाची रोज मुंबईमध्ये पाच लाख लिटर, पुण्यात दोन लाख लिटर दुधाची विक्री होते. मुंबई, पुण्याला दुधाची वाहतूक सुरू असली, तरी लॉकडाऊनमुळे हॉटेल, चहाच्या गाड्या बंद राहिल्याने दुधाची मागणी कमी झाली. मुंबई, पुणे व कोल्हापूरमध्ये साधारणत: ८० हजार लिटर दूध विक्री घटली आहे.
भाजीपाल्याच्या आवक व विक्रीवर परिणाम झाला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज २५०० क्विंटल भाजीपाल्याची आवक होते. तेवढ्या सर्व भाजीपाल्याची विक्री होते. नियमित भाज्यांच्या तुलनेत २० टक्केच आवक राहिली. आठवडी बाजार, भाजीमंडई बंद राहिल्याने शनिवारी भाज्यांची मागणी एकदमच कमी झाली. कांद्याची तीन ट्रक आवक, तर धान्य मार्केट पूर्णपणे बंद राहिले. त्यामुळे बाजार समितीची तीन कोटींची उलाढाल ठप्प झाली.
कोट-
बाजार समितीत भाज्यांची आवक कमी झालीच. त्याचबरोबर उठावही नाही. त्यामुळे समितीची सुमारे तीन कोटींची उलाढाल ठप्प झाली.
- जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)