लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील सत्तारूढ आघाडीच्या पॅनलची रचना आणि महादेवराव महाडिक मात्र अबोल, असे काहीसे विसंगत चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. पत्रकारांनी व कार्यकर्त्यांनीही वारंवार आग्रह धरूनही महाडिक एकही शब्द बोलले नाहीत. ते बोलण्याच्या प्रयत्नात असताना सत्तारूढ नेत्यांनी त्यांना बोलू दिले नाही.
गेली किमान पंचवीस वर्षे गोकुळचे राजकारण ज्यांच्या शब्दावर ठरले, चालले व फिरले अशा महाडिक यांनी पॅनल जाहीर होताना काहीतरी बोलावे, अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली. थेट महाडिक कुटुंबातील उमेदवार संघात कधीच नव्हता आता तो देण्यामागील बदल कशातून झाला, असेही पत्रकारांनी त्यांनाच थेट विचारले; परंतु तरीही त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही. तुम्ही पत्रकार काडी लावत आहेत, असे ते हसत हसत हाताने खूण करत म्हणत होते. एका टप्प्यावर ते काहीतरी बोलतील असे वाटले होते; परंतु तरीही नको नको म्हणून त्यांचे बोलणे थांबवले. प्रचारात ते बोलतील असेही यावेळी सांगण्यात आले.
महादेवराव महाडिक यांना बेधडकपणे बोलण्याची सवय आहे. त्याचा काय परिणाम होईल याची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही; परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे शिवाजी चौकातील चॅलेंज व खुपीरेतील घोषणा बरीच वादग्रस्त ठरली. ते काही बोलले तर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. त्यात मूळ प्रश्न बाजूला पडतात व महाडिक विरुद्ध सतेज पाटील या वळणावर जाते. तसे होऊ नये व गोकुळचा चांगला चाललेला कारभार घेऊन सभासदांसमोर जावे, अशी रणनीती निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे महाडिक यांना काहीच बोलू दिले नाही, शिवाय सत्तारूढ आघाडीचा चेहरा म्हणूनही पी. एन. पाटील यांच्याकडेच सारी सूत्रे दिल्याचे चित्र यावेळी दिसले.
२००४२०२१-कोल-गोकुळ सत्तारूढ ०१
कोल्हापुरात मंगळवारी सत्तारूढ आघाडीची घोषणा झाल्यानंतर आघाडीचे नेते महादेवराव महाडिक यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले; परंतु त्यांनी त्यास असे उत्तर दिले. (नसीर अत्तार)