कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला उद्या , मंगळवारी होणार आहे. सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात होणार असून सकाळी अकरापर्यंत कल स्पष्ट होईल. क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने अंतिम चित्र दुपारी दोननंतरच स्पष्ट होणार आहे. सर्वसाधारण गटातील मतमोजणीस वेळ लागणार आहे. त्याउलट राखीव गटातील निकाल पहिल्यांदा लागणार आहेत.गेली दोन महिने गोकुळचे रणांगण आरोप-प्रत्यारोपाने गाजत आहे. दूध उत्पादकांना दिलेली वेळेत दूध बिले, वर्षाला रिबेटच्या माध्यमातून दिलेले ९८ कोटींच्या जोरावर आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी रिंगणात उतरली होती तर मल्टिस्टेट, संघातील भ्रष्टाचार व सत्ता दिल्यास दोन रुपये जादा दर देण्याचे अभिवचन, हे मुद्दे घेऊन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने टक्कर दिली.
दूध संघाशी संबंधित मुद्द्यांवर निवडणुकीत चर्चा झाली खरी मात्र पालकमंत्री पाटील व महादेवराव महाडिक यांच्यातील टीका-टिप्पणीमुळे निवडणुकीत रंगत आली होती. त्यामुळेच रविवारी दोन्ही आघाड्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत एकगठ्ठा मतदान करून घेतले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इर्षेने मतदान झाले. एकूण ३६४७ मतांपैकी ३६३९ मतदान झाले.मतदारसंघनिहाय मतमोजणी अंतर्गत सर्वसाधारण मतदारसंघ मतमोजणी १८ टेबलांवर होईल. या १८ टेबलांवर प्रत्येकी २५ मतांचे गठ्ठे दिले जातील. २५ मतांची मतमोजणी शीट असेल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका २५ मतांच्या गठ्ठ्यामध्ये एकाचवेळी सर्व १८ टेबलांवर विभागल्या जातील. त्यानंतर महिला राखीव मतदारसंघातील मतमोजणी टेबल क्रमांक एक ते नऊवर होईल.
या टेबलावर ५० मतांची मतमोजणी शीट असेल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका एकाचवेळी या टेबल क्रमांक एक ते नऊ या टेबलांवर विभागल्या जातील. इतर मागासवर्गीय मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक दहा ते बारावर होईल. मतदानाच्या सर्व मतपत्रिका या टेबलावर विभागल्या जातील. भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक एक ते १५ वर होईल. झालेल्या मतदानाच्या सर्व मतपत्रिका या टेबलावर विभागल्या जातील. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक १६ ते १८ वर होईल.सर्वसाधारण गटात १६ जागांसाठी ३३ उमेदवार आहेत. त्यात येथे मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाले. त्यामुळे या गटातील मतमोजणीस वेळ लागणार आहे. त्याउलट राखीव गटातील मतमोजणी गतीने होणार आहे. त्यातही अनूसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय या तीन गटांतील निकाल पहिल्यांदा लागणार आहेत.