कोल्हापूर : घरकामासाठी पायी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीची एक तोळे सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केली. चोरट्याने जोरात हात मारल्याने इंदूबाई बाळासाहेब समुद्रे (वय ५०, रा. विक्रमनगर १ ली गल्ली) ह्या जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सकाळी महाडिक वसाहतीत चव्हाण यांच्या गिरणीसमोर घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इंदुबाई समुद्रे ह्या महाडिक वसाहतीत राहणाऱ्या लोकांच्या घरी धुण्याभांड्याची कामे करतात. सोमवारी सकाळी त्या मैत्रीण अनिता तानाजी पाटील यांच्यासोबत पायी दुसऱ्या कामावर जात होत्या. त्या चव्हाण यांच्या गिरणीसमोर आल्या त्यावेळी समोरुन आलेल्या काळ्या व केशरी रंगाच्या एका दुचाकीवरून दोघे चोरटे आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने समुद्रे यांच्या गळ्यात हिसडा मारून सोन्याची चेन धूम स्टाईलने लंपास केली. यावेळी चोरट्याने जोरात हात मारल्याने समुद्रे यांच्या गळ्याजवळ, छातीवर व कपाळावर जखम झाली. याबाबत इंदूबाई समुद्रे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
चोरट्यांचे वर्णन
भरधाव दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांपैकी चालकाच्या अंगात निळ्या रंगाचा फुर्ल शर्ट, काळ्या रंगाची पँट तर मागे बसलेल्या चोरट्याच्या अंगात आकाशी रंगाचा चौकटा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅट, पायात ऑरेंज रंगाचे शूज घातले होते, अशी माहिती फिर्यादी समुद्रे यांनी पोलिसांना दिली.