कोल्हापूर : केंद्र सरकारने पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याने आलेली आर्थिक टंचाई आणि ठरावीक रकमेपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करणाऱ्यांची चौकशी होण्याच्या धास्तीने दहा दिवसांनंतरही कोल्हापुरातील सराफ बाजारपेठेत शांतता आहे. एक तोळ््याच्या आतील दागिन्यांचेच व्यवहार गुजरीत होत असून, त्यापुढील रकमेच्या खरेदीसाठी सरकारच्या नियमावलीचे पालन केले जात आहे. कोल्हापुरातील सराफांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गुजरीत ऐन लग्नाच्या सिझनमध्ये शुकशुकाट आहे. सुवर्ण व्यावसायिक दुकान उघडून दिवसभर निवांत बसतात चुकून काही दुकानांत दोन-तीन ग्राहक दिसतात. त्यांचीही खरेदी अगदी किरकोळ, असे सध्या सराफ बाजाराचे चित्र आहे. काही दिवसांत लग्नसराई सुरू होणार आहे त्यासाठी दागिन्यांची खरेदी गरजेची असताना बाजारपेठेत मंदी आहे. हातात पैसाच नसल्याने दागिने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडूनही फार-फार तर एक-दीड तोळ््याच्या आतील सुवर्णालंकारांची खरेदी केली जाते. सराफ व्यावसायिक जुन्या पाचशे हजाराच्या नोटा स्वीकारत नाहीत. ग्राहक नवीन नोटा घेऊन आले तर ५० हजार रुपयांपर्यंतच्या दागिन्यांची विक्री रोख रक्कम घेऊन केली जाते. त्यापुढील रकमेची खरेदी असेल, तर पॅनकार्डच्या झेरॉक्सची मागणी केली जाते.कारागीरांचे हाल..मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरातील सराफ बाजारपेठेचा नंबर लागतो, कोल्हापूर सराफ व्यापारी संघात सातशे सभासद आहेत आणि शहरात एकूण दीड ते दोन हजारांच्या आसपास सराफ व्यावसायिक आहे. त्यामुळे येथे परराज्यांतील कारागीरांची संख्या अधिक आहे. सुवर्ण व्यावसायिक बंगाली, दैवज्ञसारख्या कारागीरांकडून सोन्याचे अलंकार घडवून घेतात. त्यांना अलंकार घडविताना होणाऱ्या सोन्याच्या तुटीच्या माध्यमातून पगार दिला जातो. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून सुवर्णालंकारांना मागणीच थांबल्याने या कारागीरांवरदेखील बेकारीची वेळ आली आहे. सराफ व्यावसायिकांकडून त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत केली जात आहे. मात्र, हे आणखी किती दिवस चालणार याचा अंदाज लागत नाही. ग्राहकाकडे नव्या नोटा असतील तर एक दीड तोळ््यांपर्यंतच्या सुवर्णालंकारांची विक्री रोख रकमेने केली जात आहे. मात्र, नव्या नोटा अजून फारशा उपलब्ध नसल्याने बाजार थंड आहे.- राजेश राठोड (उपाध्यक्ष कोल्हापूर सराफ व्यापारी संघ)आम्ही सकाळी दुकान उघडून दिवसभर निवांत बसतो. चुकून ग्राहक आलाच तर त्यांचीही खरेदी किरकोळ असते. बाजारपेठ ठप्प झाल्याने कारागीर अडचणीत आले आहेत. - मनिष ओसवाल(सराफ व्यावसायिक)
तोळ्याच्या आतच सोन्याचे व्यवहार
By admin | Published: November 18, 2016 12:53 AM