कोल्हापूर/ राशिवडे : तुर्कस्तान येथे झालेल्या जागतिक शालेय कुमार कुस्ती स्पर्धेत ६३ किलो गटात सुवर्णपदक मिळविलेल्या सौरभ अशोक पाटील (रा. राशिवडे) याचे दसरा चौक येथे गुरुवारी सकाळी फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी सौरभचा श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. १९८३ नंतर सौरभने प्रथम शाहूनगरीत कुस्तीपंढरीला जागतिक शालेय कुमार गटात सुवर्णपदक मिळवून दिले आहे. यानिमित्त हनुमान कुस्ती आखाडा (राशिवडे) तर्फे सौरभ याची मिरवणूक काढण्यात आली. सौरभने प्रथम दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. पुढे शिवाजी चौक, भवानी मंडप, बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम (क्रीडा कार्यालय), जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ, वाशी नाका, असे मार्गक्रमण करीत ही मिरवणूक राशिवडे येथे दुपारी पोहोचली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, फत्तेसिंह घोरपडे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, अवधूत पाटील, शंकरराव शेळके, दीपक देवळकर, मधुकर शिंदे, सुहास कुंभार, कृष्णात लाड, आखाड्याचे अध्यक्ष समीर गुळवणी, वस्ताद कृष्णाजी चौगले, प्रशिक्षक सागर चौगले, राधानगरी पंचायत समितीचे सदस्य संभाजी चौगले, सुनील पोवार, राशिवडेचे सरपंच सागर धुंदरे, रमाकांत तोडकर, शिवाजी चौगले, कुस्तीशौकीन उपस्थित होते.राशिवडे येथे फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताशांच्या कडकडाटात सौरभचे स्वागत झाले. सौरभच्या बहिणी रूपाली कवडे व दीपाली डोंगळे, कुटुंबीयांनी त्याचे औक्षण केले. यावेळी कुस्ती शौकीन, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. कोल्हापूरहून बाहेर पडल्यापासून वाशी, कांडगाव, हळदी, कोथळी, कुरुकली, परिते, भोगावती येथे आतषबाजीत स्वागत करण्यात आले. सौरभच्या गरुडभरारीचे कौतुकवडील अशोक पाटील हे राशिवडे गावात हमालीचे काम करतात. आई शेतमजूर होती. सहा महिन्यांपूर्वी तिचे सर्पदंशाने निधन झाले. वडिलांनी अत्यंत कष्ट घेऊन सौरभला मदत केली. कृष्णात लाड व अन्य मंडळीनींही त्याला मदत केली. उद्योजक मच्छिंद्र लाड यांनी सौरभला दत्तक घेऊन आर्थिक भार हलका केला. या मदतीवरच त्याने या स्पर्धेत जिंकण्याच्या ईर्षेने प्रतिस्पर्धी परदेशी मल्लांवर मात केली आणि ६३ किलो गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. राशिवडे ते तुर्कस्तानपर्यंतच्या प्रवासाबद्दल आणि त्याच्या कामगिरीचे अनेकांनी कौतुक केले आहे.
सुवर्णपदक विजेत्या सौरभ पाटीलची मिरवणूक
By admin | Published: July 22, 2016 12:40 AM