कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने सुवर्णालंकार खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. ग्राहकांकडून लग्नसराई अथवा कौटुंबिक समारंभानिमित्त आवश्यक असेल तेवढ्याच सोन्याच्या अलंकारांची खरेदी केली जात आहे. तर गुंतवणूक म्हणून करण्यात येणारी खरेदी थांबली आहे.सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यातच गुरुवारी सोन्याने ४२ हजारांचा टप्पा पार केला. वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींचा परिणाम म्हणून दोन महिन्यांपूर्वी १० ग्रॅमला ४० हजार रुपये इतका दर सोन्याने गाठला होता. या आठवड्यात रोज किमान ४००, ५०० रुपयांची वाढ होऊन शुक्रवारी तो ४२ हजार ५०० रुपये इतका झाला.गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते, मात्र आता सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने गुंतवणूक म्हणून केली जाणारी खरेदी जवळपास थांबली आहे. एका ठरावीक टप्प्यांपर्यंत दरवाढ झाली की सोन्याचे दर स्थिरावतात. मात्र, गेल्या दोन तीन महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढच होत आहे. त्यामुळे जोपर्यंत हा दर स्थिरावत नाही तोपर्यंत ग्राहकांकडून आवश्यक अलंकार वगळता सोने खरेदीत अशीच घसरण राहणार आहे.
सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ठरतो, आणि त्याचे परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होतात. सोन्याचा दर ४० हजारांवर गेल्यापासूनच गुंतवणूक म्हणून केली जाणारी खरेदी थांबली आहे. दर स्थिरावत नाहीत तोपर्यंत ही स्थिती अशीच राहील.- लक्ष्मण माने, व्यावसायिक