गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील तलाव परिसरात खेळत असलेल्या मुलांना सोने असलेली प्लास्टिकच्या पिशवी सापडली. याची गोपनीय माहिती गांधीनगर पोलिसांना मिळताच या मुलांकडून त्यांनी हे सोने ताब्यात घेतले. पिशवीत सोन्याची बिस्किटे आणि सोन्याची नाणी आहेत.याबाबतची माहिती अशी की, गडमुडशिंगीतील तालावाजवळ चार शाळकरी मुलांना खेळत असताना सोन्याची बिस्किटे आणि नाणी असलेली प्लास्टिक पिशवी सापडली. ती मुलांनी आपल्या पालकांच्या स्वाधीन केल्याची गोपनीय माहिती गांधीनगरच्या पोलिस हवालदार बजरंग हेबाळकर आणि संदीप कुंभार यांना खबऱ्यामार्फत मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी हेब्बाळकर आणि कुंभार घटनास्थळी गेले. त्या ठिकाणी राहणारे विश्वास आप्पासो गडकरी आणि सुभाष गवळी यांच्याकडे चौकशी केली.त्या दोघांच्या माहितीनुसार रोहित विश्वास गडकरी, ऋषिकेश विश्वास गडकरी, चेतन सुभाष गवळी आणि नागेश महेश कांबळे ही मुले १६ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास तळ्याकाठी खेळत होती. त्यावेळी त्यांना गवतामध्ये प्लास्टिक पिशवीत सोनेरी रंगाची बिस्किटे आणि नाणी सापडली. ही पिशवी मुलांनी विश्वास गडकरी यांच्याकडे दिली.पोलिसांनी ही पिशवी ताब्यात घेतली. त्यात १० ग्रॅमची ४ सोन्याची बिस्किटे, १० ग्रॅमची २ नाणी आणि ५ ग्रॅमचे नाणे असे एकूण ३९४.४०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे आणि नाणी होती. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर, संदीप कुंभार, चेतन बोंगाळे, संतोष कांबळे यांनी केला. तसेच हे सोने ज्याचे आहे त्यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून ताब्यात घ्यावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी केले आहे.पोलीस हवालदार बजरंग हेबाळकर आणि संदीप कुंभार यांनी गोपनीयरीत्या तपास करून हा २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापुरातील गडमुडशिंगीत २४ लाखांचे सोने सापडले, लहान मुलांना खेळताना सापडली पिशवी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:52 AM