आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३0 : कोल्हापूरचा गोल्डन बॉय आॅलंम्पिकवीर , अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू व मालवणचा तहसिलदार विरधवल खाडे शुक्रवारी मुंबईस्थित आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋजुता भट हिच्याशी विवाहबद्ध होत लग्नाच्या बेडीत अडकला. कोल्हापूरातील कसबा बावडा येथील महासैनिक दरबार येथे झालेल्या दिमाखदार विवाह सोहळ्यासाठी प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक मिहार अमीन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. देशाचा गोल्डन बॉय ठरलेल्या आॅलिम्पिकवीर जलतरणपटू वीरधवल सध्या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत असून तो मालवण (जि.सिंधुदुर्ग) येथे तहसिलदार म्हणून कार्यरत आहे. त्याने यापुर्वी आॅलंम्पिक जलतरण स्पर्धेत भारतीय संघाकडून प्रतिनिधीत्व केले होते. २००६ साली सहा सुवर्णपदकांसह पाच राष्ट्रीय विक्रमांची नोंदही विरधवलच्या नावावर आहे. त्याने देशासाठी सुवर्णमय केलेल्या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने त्याला २०१० साली अर्जुनवीर पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असलेल्या ऋजुता भटनेही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. ऋजुताचे वडील दीपेन भट हे पेशाने प्राध्यापक आहेत. तर आई मीता या गृहीणी आहेत. विवाहसाठी उपस्थितांचे स्वागत वीरधवलचे वडील विक्रांत व आई सुनिता यांनी केले. या विवाहबद्ध जोडप्यास शुभार्शिवाद देण्यासाठी मान्यवर उपस्थित होते. यात माजी आमदार व विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, नॅशनल डेअरीचे चेअरमन अरुण नरके, बेंगलरुचे आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक मिहार अमीन, भारतीय जलतरण फेडरेशनचे सचिव विरेंद्र नानावटी, उपाध्यक्ष प्रदीप कुमार , प्रविणसिंह घाटगे, आॅलंम्पियन जलतरणपटू संदीप शैजवल, स्वाभीमान शेतकरी संघटनेचे भगवान काटे, जिल्हा परिषद सदस्य राहूल पाटील, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ.पी. टी. गायकवाड, जिल्हा क्रीडाअधिकारी माणिक वाघमारे, श्रीकांत जांभळे, कृषी बाजार समिती सभापती सर्जेराव पाटील, सदानंद कोरगांवकर, नंदकुमार वळंजू, अमर क्षीरसागर आदींचा समावेश होता.
‘गोल्डन ’ बॉय वीरधवल अडकला लग्नाच्या बेडीत
By admin | Published: June 30, 2017 3:25 PM