कोल्हापूर : कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या पाचही शिखरांना सोन्याचा मुलामा देण्यासाठी शिखरांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या आॅडिटनंतर शिखरांची स्थिती, हेरिटेज समितीची परवानगी, तांब्याच्या शिखरांचे वजन, त्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी लागणारे सोने यांची मोजणी करून अंतिम निर्णय घेतला जाईल.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर प्रथमच झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करणे, मंदिर परिसराचा विकास, गरजू रुग्णांसाठी लॅब, देवस्थानअंतर्गत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी वाटप, मंदिराच्या पाचही शिखरांचे स्ट्रक्चरल आॅडिट अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, एस. एस. साळवी, सुयश पाटील उपस्थित होते.अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरासाठी सोने देण्याची तयारी एका भाविकाने दर्शविली होती. केवळ एकाच शिखरालाच नव्हे तर पाचही शिखरांना सोन्याचा मुलामा देण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. त्यासाठीेच्या स्ट्रक्चरल आॅडिटचे काम पिडिलाईट कंपनीकडे सोपविण्यात आले असून, ते विनामोबदला ही सेवा देणार आहेत. शिखरांची स्थिती, मोजणी याबाबत माहिती घेतल्यानंतर सोन्याचा मुलामा देण्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाईल. सोन्याचा मुलामा देण्यासाठी २० ते ३० किलो सोने लागणार आहे, त्यासाठी सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी लागणारे सगळे सोने व निधी लोकसहभागातून संकलित करण्यात येणार आहे. याशिवाय परिसरातील पूजेचे साहित्य विकणारे दुकानदार, हारविक्रेते, समितीचे सुरक्षारक्षक यांच्याकडून भाविकांना व्हीआयपी दर्शन घडविले जाते. त्यासाठी पैशांचीदेखील देवाणघेवाण होते. या प्रकारावरही समिती निर्बंध घालणार आहे. दरम्यान, मंगळवारच्या बैठकीत देवस्थान समितीअंतर्गत असलेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले.खासगी पुजाऱ्यांकडून अभिषेक बंदअंबाबाई मंदिराच्या गरूड मंडपात खासगी पुजाऱ्यांकडून केले जाणारे अभिषेक बंद करण्याचा निर्णय यावेळी समितीने घेतला आहे. त्यामुळे देवीच्या पूजेचा वार असलेले श्रीपूजक आणि देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य कोणत्याही पुजाºयांना आता गरूड मंडपात अभिषेक करता येणार नाही. सध्या येथे मंदिरात देवीच्या पूजेचा आठवडा असलेले पुजारी व देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य पुजारीदेखील येथे अभिषेक विधी करतात. अशा पुजाºयांकडून भक्तांना देवीचा अभिषेक घडवून दिला जातो, परस्पर पावती केली जाते, भरमसाट दक्षिणा घेतली जाते, यातून भाविकांची लूट व फसवणूक होते, अशा तक्रारी समितीकडे आल्या आहेत. याची दखल घेत समितीने हा निर्णय घेतला आहे.लॅबसाठी देवल क्लबची जागासमितीच्यावतीने गरजू रुग्णांसाठी माफक दरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून देणारी लॅब सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी खासबाग येथील नवीन देवल क्लबच्या मागील बाजूची इमारत निश्चित करण्यात आली आहे. सध्या ती भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असली तरी भविष्यात खरेदी करण्याचा समितीचा विचार आहे.
अंबाबाई मंदिराच्या शिखरांवर सोन्याचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:19 AM