कोल्हापूर : गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजाची जातनिहाय जनगणना करावी,यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.दरम्यान समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील मागण्या अशा, भारत सरकार नियुक्त दादा इदाते आयोग समितीच्या शिफारशी (जानेवारी १९९९) जशास तशा लागू कराव्यात. ‘एससी’, ‘एसटी’ च्या धर्तीवर भटक्या विमुक्तासाठी स्वतंत्र तिसरी सुची कायमस्वरुपी आयोगाचा घटनात्मक दर्जा द्यावा.
जातीच्या दाखल्यासाठी १९६१ पूर्वी दाखल्याची अट रद्द करुन शासन निर्णय २००८ प्रमाणे पुनर्जिवीत करावे.शासनाच्या ताब्यातील गायरानाच्या जागा गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजाला घरकुलासाठी मिळाव्यात. गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजाला २.५ टक्के आरक्षण असून ते आता जनगणनेच्या प्रमाणात वाढवून द्यावे.
दरम्यान ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठींबा व्यक्त केला, आंदोलनात अध्यक्ष सुभाष भोजणे, उपाध्यक्ष अभिजीत गजगेश्वर, शहराध्यक्ष बाळासाहेब काळे, संजय भोळे, उमेश बागडे, सुरेश पाटील, महेश भिसे, कृष्णात गोंधळी आदी सहभागी झाले होते.