विनोद सावंत/
कोल्हापूर : महापालिकेतील ६४० रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत. त्यांना कायम करण्याचा प्रस्ताव लवकरच तयार करून राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. २० ते ३० वर्षे महापालिकेसाठी राबणाऱ्यांना यामुळे न्याय मिळणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनीच खुद्द यासाठी पुढाकार घेतल्याने यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कायम होईल, या आशेने कोल्हापूर महापालिकेत ६४० रोजंदारीवरील कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये १९९० पासून महापालिकेत सेवेत असणारे काहीजण आहेत, तर सेवानिवृत्ती होण्यास एक किंवा दोन वर्षे बाकी असणारेही काही आहेत. निवृत्त होताना कायम कर्मचारी म्हणून निवृत्त व्हावे, अशीही भावना यामधील काहींची झाली आहे. संपूर्ण आयुष्य महापालिकेसाठी खर्ची घालणाऱ्या या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, अशी लेखी मागणी कर्मचारी संघाने प्रशासनाकडे केली आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनीच आता यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कर्मचारी संघ, महापालिका प्रशासनासोबत यासंदर्भात काही बैठका घेतल्या. महापालिकेने राज्य शासनाकडे ६४० कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव पाठवा, तो मंजूर करून घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
चौकट
विभागनिहाय रोजंदारी कर्मचारी
पवडी कर्मचारी : ११०
आरोग्य विभाग : २२०
बागा खाते : ७०
सफाई : ४०
डांबरी कोटा : २००
चौकट
...अन्यथा १५० कर्मचाऱ्यांना फटका
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तात्काळ प्रस्ताव मंजूर केल्यास ६४० कर्मचारी कायम होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, विलंब झाल्यास यामधील १५० कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. हे कर्मचारी पुढील एक-दोन वर्षात निवृत होणार असून त्यांना याचा फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे जलदगतीने याची प्रक्रिया होणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया
महापालिकेत २० ते ३० वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आस्थापनावर ताण न पडता त्यांना कायम करणे शक्य आहे. सातवा वेतन आयोगाचा प्रश्न जसा मार्गी लावला, त्याप्रमाणे रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचाही मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.
- संजय भोसले, अध्यक्ष, कर्मचारी संघ, महापालिका