कोल्हापूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राबवण्यात येत असलेल्या लोकसभा प्रवास योजनातंर्गत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यामधील गावात केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा प्रवास योजनेनुसार, ते तिसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी, त्यांनी आपल्या कुलदैवताचे दर्शन घेत प्रार्थना केली.
ज्योतिरादित्य शिंदेंनी मागील दौऱ्यात त्यांनी चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यामध्ये विकासकामांचा आढावा घेतला होता. यावेळी ते वाळवा आणि शिराळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. पेठनाका येथे त्यांनी महाडिक शैक्षणिक संकुलातील नवमतदार असलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. देशाचे भविष्य तरुणाईच्या हाती आहे. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तत्त्पूर्वी त्यांनी कोल्हापूरच्या ज्योतिबा देवस्थानला जाऊन दर्शन घेतले. यावेळी, आपण आपल्या कुलदैवताचे दर्शन घेतले, तसेच मंदिरातील केदारेश्वर महादेव आणि चोपराई देवीची पूजा-अर्चना केल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्रातून आलेल्या सर्व योजना ठप्प होत्या. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नव्हते. राज्यात भाजप-सेनेचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. देशाला जागतिक स्तरावरील आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या, असे आवाहनही यावेळी जोतिरादित्य शिंदे यांनी केले.