आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ, नवा विश्वास देत मराठी नववषार्रंभ असलेला गुढीपाडवा मंगळवारी मंगलमयी वातावरणात पार पडला. दारात सुरेख रांगोळी, भरजरी वस्त्र, चाफ्याची माळ, साखरेच्या हाराचा श्रूंगार ल्यालेल्या गगनचुंबी गुढीने घराघरात शुभशकुनांचा आनंद पसरला. गेल्या काही महिन्यांपासून मंदीचा सामान करत असलेल्या बाजारपेठेचाही बॅकलॉक भरुन काढत घरोघरी मुहूर्ताची खरेदी होत नव्या वस्तूंचे आणि वाहनांचे आगमन झाले.
शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरावटींसोबत चैत्र पाडवा घरी आला..’ या उल्हासी पंक्तींसमवेत दारात सजलेली गगनचुंबी गुढी, दारात रंगांचा सुरेख मिलाफ करून सजलेली रांगोळी, तोरण, घरात पुरणपोळीच्या पक्वान्नांचा घमघमाट आणि सोबत कडुनिंबाच्या गोळीने आरोग्यदायी जीवनाचा संदेश देणारा गुढीपाडवा खरेदी उत्सवाने साजरा करण्यात आला.
चैत्र पाडवा म्हणजे वसंत ऋतूचे आगमन. महिलांनी घरादाराची स्वच्छता करून सुरेख रांगोळीचा गालिचा बनविला. घरातील पुरुष मंडळी गुढी उभारण्यासाठीच्या तयारीत गुंतली होती, तर सुवासिनी महिलांनी काठापदराच्या साड्या घालून गुढीची पूजा करण्यासाठीच्या साहित्यांची मांडणी केली. या सोहळ््यात सहभागी होत लहान मुलीही नऊवारी साड्या घालून मिरवत होत्या, तर मुले वडिलधाऱ्यांच्या कामात मदत करण्यासाठी धडपडत होती.
दुसरीकडे पुरणपोळीसारख्या पक्वान्नांचा सुगंध दरवळत होता. तांब्याचा तांब्या, रेशमी वस्त्र, कडुनिंबाचा डहाळा, साखर-खोबऱ्याच्या माळा घालून प्रत्येकाच्या घरावर सजलेली गुढी जणू आकाशाला गवसणी घालत होती. त्यानंतर गुढीची पूजा, आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
गुढीपाडवा हा दिवस वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असल्याने यादिवशी खरेदीला विशेष प्राधान्य दिले जाते. सोन्यासह आपल्या आवडीची दुचाकी, कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू चार-पाच दिवसांपूर्वीच बुकिंग केल्या होत्या, तर काही नागरिक सहपरिवार आवडीची वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात फिरताना दिसत होते.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर नवीन वस्तू घरी नेण्याची लगबग दिवसभर दिसत होती. यासह दुचाकी-चारचाकी वाहने, मोबाईलसह फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन तसेच एलईडी, मोबाईल अशा वस्तूंच्या खरेदीसाठी शोरूममध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक्स्चेंज आॅफरसह शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा, एक्स्चेंज स्किम, हमखास भेटवस्तू, स्क्रॅच कुपन्स, आदी योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बाजारपेठेत उत्साह संचारला होता.
सुवर्ण खरेदी... मुहूर्ताची खरेदी म्हणून सोने खेरदीला आजही प्राधान्य दिले जाते. लग्नसराई काही दिवसांवर आल्याने मंगळसूत्र, कानातले, डिझायनर नेकलेस या अलंकारांना सर्वाधिक मागणी होती. त्याशिवाय गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून अनेक ग्राहकांनी चोख सोने, सोन्याचे नाणे, वळे खरेदीवर भर दिला. ब्रँडेड ज्वेलर्समध्ये तर सायंकाळी पाय ठेवायलाही जागा नव्हती. तसेच ग्राहकांनी गुजरी परिसर फुलून गेला होता.
सायकल, दुचाकीसह चारचाकीलाही मागणी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुचाकींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. बुकिंग केलेल्या गाड्या मुहूर्तावर घरी नेण्यासाठी शोरूममध्ये लगबग सुरू होती. अनेकजण गाडी घेऊन येतो तयारी करा, असे घरांत फोन करून सांगत होते. चारचाकी वाहनांच्या शोरुममध्येही ग्राहकांची मोठी वर्दळ होती. शाळेतील मुलांसह आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी अनेकजण पाडव्याच्या मुहूर्तावर सायकली खरेदी करताना दिसत होते. गिअर व मल्टी स्पेशालिटी असलेल्या सायकलींना शालेय विद्यार्थ्यांकडून विशेष मागणी होती.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना सर्वाधीक मागणी खरेदीमध्ये यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना सर्वाधीक मागणी होती. उन्हाळ््यात गारवा देणारे कुलर, एसी, फ्रीज सह वॉशिंग मशीन, ‘एलईडी मायक्र ोवेव्ह ओव्हन आदी मनपसंत वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी शोरुम्सचे दालन भरुन गेले होते. या दिवसानिमित्त विक्रेत्यांनी ग्राहकांना सुलभ अर्थपुरवठा, एक्स्चेंज स्किम, हमखास भेटवस्तू, स्क्रॅच कुपन्सची अनोखी भेट दिली. या वस्तू नेण्यासाठी सकाळपासूनच हौदा रिक्षा, मिनी टेम्पोंना मोठी मागणी होती.