कोल्हापूर : कोल्हापूरात शुक्रवार सायंकाळपासून पावसाने चांगली उसंत घेतली असून शनिवारी सकाळी चक्क सुर्यदर्शन झाल्याने सततच्या पावसाने त्रासून गेलेल्या लोकांना बरे वाटले. उन्हाची हलकी तिरीप थोडा उत्साह वाढवून गेली. तर, सूर्यकिरणाच्या प्रकाश अंगावर पडल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावरही प्रसन्न भावमुद्रा दिसून आल्या आहेत.
कोल्हापूर शहरातील पूरस्थिती कमी होत आहे. शनिवारी सकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी दोन फुटांनी कमी झाली. ती आता ५२ फुटांवर आहे. पुणे-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग आणि कोल्हापूरला कोकण, सांगलीशी जोडणारे सर्व मार्ग आजही बंदच आहेत. सकाळपासून हातात २० लिटरचे कॅन घेऊन लोक मिनरल वॉटर विकत मिळणाऱ्या केंद्रासमोर रांगा लावून उभे असल्याचे चित्र दिसत आहे. पेट्रोल पंपावरही तशाच रांगा असून अनेक पंप बंदच आहेत. भाजी मंडईमध्ये ग्रामीण भागातून भाजीपाला आवक बंद असल्याने भाजीचे दर गगनाला भिडले आहेत. कोणतीही भाजी घेतली तरी ५० रुपये पावकिलोच्या खाली एकही भाजी मिळत नाही. पाऊस कमी झाल्याने महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या भागात लोक दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसत होते.