दत्तात्रय पाटील
म्हाकवे
निराधाराला आधार, प्राणिमात्रावर दया, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम, वृक्षसंवर्धन या सामाजिक कार्याबरोबरच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगला संदेश आणि माहिती तंत्रज्ञान, घडामोडीचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहे;चविणे हेही आता सामाजिक कार्यच बनले आहे. हे कार्य बानगे (ता. कागल) येथील अमर लक्ष्मण पाटील हा युवक गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत निरपेक्ष आणि प्रांजळपणे करीत आहे.
चार व्हॉटस ॲप ग्रुप तयार करून ९५० युवा शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती, हवामानातील बदल, पिकांबद्दल योग्य माहिती मिळवून देत आहे. विशेष म्हणजे अमर हा भूमिहीन असून केवळ पाचवीपर्यंत शिकलेला आहे. मात्र, दुसऱ्याची शेती भाडेतत्त्वावर करीत मिळविलेले ज्ञान कृषी पदवीधारकांनाही लाजवेल असेच आहे.
जगात सर्व वस्तू तयार करणारे कारखाने आहेत. मात्र अन्नधान्य हे शेतकऱ्यानेच पिकवावे लागते; त्यामुळे शेतीला युवाशक्तीची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर अधिक अन्नधान्य उपलब्ध होऊ शकते. हाच ध्यास घेत ‘आत्मा’चे सदस्य असणारे अमर हे निर्व्याजपणे कार्यरत आहेत.
दरम्यान, अमर यांनी २५५ माप्रणे चार ग्रुप करून यामध्ये विविध कृषितज्ज्ञ, आजी-माजी शास्त्रज्ञ यांना समाविष्ट केले आहे. शेतकरी आपल्या भाजीपाला, फळे व इतर पिकांबाबतच्या समस्या, पिकांवर आलेली रोगराईचे फोटो पाठवून सल्ला विचारतात. संबंधित पिकाची संपूर्ण माहिती असणारे तज्ज्ञ याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतात. त्यामुळे युवा शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
विनामानधन अखंडित सेवाभावी कार्य
साध्या कुडाच्या घरात राहणारे अमर हे पहाटे पाच वाजता उठून, जनावरांची व्यवस्था करून फावल्या वेळेत ते याचे नियोजन करतात. त्याच्या कामाची दखल घेत कागलचे कृषी अधिकारी भिंगारदिवे यांनी सन्मानित केले आहे. मात्र, केवळ कौतुकाने पोट भरत नाही. त्यासाठी शासनाकडून अशा होतकरू तरुणासाठी मानधनाची तरतूद केली तर आणखी प्रेरणादायी काम व्हायला मदत होईल.
फ्री मेसेज आणि डाटाचा असाही वापर
पूर्वी बीएसएनएलच्या कृषी कार्डधारकांना ४०० एसएमएस मोफत होते. त्याचा वापर कृषी संदेश देण्यासाठी केला जात असे; तर आता ॲण्ड्रॉईड फोन व फ्री मिळणारा डाटा यांचाही सदुपयोग करून खत, कीटकनाशके, तणनाशके यांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात करण्याच्या पद्धतीबाबत माहिती दिली जाते.