कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई ही कोविडकाळात बंद केलेली सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सोडण्याचा, कोल्हापूर ते कलबुर्गी एक्सप्रेस सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा आणि पंढरपूरच्या भाविकांसाठी कोल्हापूरहून कुर्डूवाडीपर्यंत पॅसेंजर सुरु करण्याच्या निर्णयाला रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी मान्यता दिली. याची अंमलबजावणी येत्या १५ दिवसांत होणार आहे.
मिरज जंक्शन रेल्वेस्थानकाचा मॉडेल स्थानक म्हणूनच पुनर्विकास केला जाणार असल्याची माहिती पुणे विभागीय प्रबंधक इंदु दुबे यांनी शुक्रवारी जाहीर केले. यासाठी ५०० कोटीची तरतुद केल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुण्यात रेल प्रबंधक कार्यालयात शुक्रवारी मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांची बैठक झाली. मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांच्या प्रश्नांना इंदू दुबे यांनी उत्तर दिले.
यावेळी मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी (कऱ्हाड), शिवनाथ बियाणी (कोल्हापुर), निखिल कांची (पुणे), बशीर सुतार (पिंपरी), बाबासाहेब शिंदे(पुणे), सुरेश माने (पुणे), दिलीप बटवाल (चाकण), अजित चौगुलेही या बैठकीला उपस्थित होते.
पंढरपूरसाठी रोज पहाटे पॅसेंजर
पुण्याहून कोल्हापूरपर्यंत रिकामी धावणारी पॅसेंजर रेल्वे पंढरपूरच्या भाविकांसाठी कोल्हापूरहून कुर्डूवाडी मार्गावर पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सल्लागार सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली.
एक्सप्रेस गाड्यांना वळीवडे, रुकडीचा थांबा
दादर ते पंढरपूर एक्सप्रेसचा विस्तार मिरजेपर्यंत करण्याचा आणि कोल्हापूर ते सिकंदराबाद व्हाया कलबुर्गी एक्सप्रेस साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णयही झाला. मिरज ते पुणे आणि मिरज ते कोल्हापूर या विभागांमध्ये काही एक्सप्रेस गाड्यांना वळीवडे, रुकडी, सांगली, किर्लोस्करवाडी, ताकारी, कऱ्हाड आणि सातारा येथे थांबा मिळणार आहे. यातील काही रेल्वे स्थानकांवर थांबा सुरु झाल्याचे सीनियर डिव्हिजन ऑपरेटर मॅनेजर डॉ. स्वप्रिल नीला यांनी सांगितले.