पन्नासहून अधिक तरुणांना केले व्यसनापासून मुक्त
गणपती कोळी :
कुरुंदवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रम केवळ वृद्धांची सेवा करत वर्षभरात आश्रमचालक बाबासाहेब पुजारी यांनी पन्नासहून अधिक तरुणांना व्यसनापासून मुक्त केले आहे. त्यामुळे जानकी वृद्धाश्रम व्यसनमुक्तीचे केंद्र बनले आहे.
पुजारी मायलेकराने गेल्या चौदा वर्षांपासून शासकीय मदतीविना दात्यांच्या दातृत्वावर वृद्धाश्रम चालविला आहे. अंध, अपंग, मतिमंद यासह ४५ हून अधिक वृद्ध वृद्धाश्रमात आहेत. आश्रमातील वृद्धांची संख्या वाढविण्यापेक्षा वृद्ध आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात समझोता करून आतापर्यंत शंभरावर वृद्धांना त्यांचे घर मिळवून दिले आहे.
वृद्धांना जीव रमावा यासाठी कापूर, उदबत्ती तयार करणे, गोशाळा या माध्यमातून त्यांच्या हाताला काम देऊन स्वावलंबनातून स्वाभिमान जागृत केला आहे. त्यामुळे आदर्श वृद्धाश्रम म्हणून नावारूपाला आले आहे. वृद्धांच्या सेवेबरोबर गेल्या वर्षभरापासून तरुणांना व्यसनापासून मुक्ती देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
दारूमुळे बरबाद होणारे आयुष्य, कौटुंबिक कलह, संसाराची होणारी राखरांगोळी याबाबत पुजारी यांनी व्यसनी तरुणांना प्रबोधन करत काही दिवस वृद्धाश्रमात वृद्धांची सेवा करण्यात वेळ घालविल्याने आपसूकच तरुण व्यसनापासून मुक्त होत आहेत. वर्षभरात पन्नासहून अधिक व्यसनी तरुण व्यसनापासून मुक्त झाले आहेत. यामध्ये गावातील दहा तरुणांचा समावेश आहे. तरुण व्यसनमुक्त झाल्याने व त्यांचा संसार सुरळीत झाल्याने त्यांच्या कुटुंबातून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे वृद्धाश्रम आता व्यसनमुक्तीचे केंद्र बनले आहे.
चौकट -
बाबासो पुजारी यांची समाजसेवा
घोसरवाड गावातील दहा ते बारा तरुणांचे व्यसन सोडविल्याने तरुणांच्या घरातील पालकांनी मुलगा पुन्हा व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी त्यांना पुन्हा सेवेसाठी वृद्धाश्रमात ठेवले आहेत. गावातील असे सहा तरुण गेल्या चार महिन्यांपासून आजही वृद्धाश्रमात वृद्धांची सेवा करत आहेत. आश्रमचालक पुजारी यांनी प्रामाणिक समाजसेवेतून गावचा विश्वास संपादन करत ‘पिकते तिथे विकत नाही’ ही म्हण खोटी ठरवली आहे.
फोटो - ३०१२२०२०-जेएवाय-०३-बाबासो पुजारी