इंदुमती गणेश, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर व इचलकरंजी ही दोन शहरे व हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी, करवीर, गडहिंग्लज, पन्हाळा हे सहा तालुके केरोसिनमुक्त झाले आहेत. सध्या सहा तालुक्यांमधून १०८ किलोलीटर इतकी केरोसिनची मागणी असून गेल्या दीड वर्षांतील सर्वांत कमी आकडेवारी आहे.
घराघरांतील विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना धूर करणाऱ्या चुलीपासून मुक्तता मिळावी, त्यांचा श्रम व वेळ वाचावा यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना केंद्र सरकारने सुरू केली होती. या योजनेअंतर्गत १५ जानेवारी २०२० पर्यंत १ लाख ७८ हजार ९८० इतके अर्ज आले होते, त्यापैकी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात १ लाख ७१ हजार २३६ इतके गॅस कनेक्शन देण्यात आली. त्यानंतर ही योजना बंद झाली आहे.
पूर्वी कोल्हापूर जिल्ह्याला ४१२ कि.ली इतक्या केरोसीनची मागणी केली जात होती. त्यात कमालीची घट होऊन ही आकडेवारी आता १०८ कि. ली. वर आली आहे. सध्या जिल्ह्यातील कागल, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, आजरा, चंदगड या सहा तालुक्यांमध्ये केरोसिनच्या टँकरचा पुरवठा केला जात असून ही मागणीदेखील कमी व्हावी यासाठी पुरवठा विभाग प्रयत्न करत आहे.
---
शाहूवाडी मुक्त, कागलमधून सर्वाधिक मागणी
शाहूवाडीसारखा दुर्गम भागांतील तालुकादेखील नुकताच केरोसिनमुक्त झाला आहे. मात्र, कोल्हापूर शहरालगत असलेल्या कागल तालुक्यातून केरोसिनची सर्वाधीक ३६ कि. ली. इतकी मागणी आहे. त्यानंतर भुदरगडचा नंबर असून या तालु्क्यातून २४ कि. ली. इतकी मागणी आहे.
--
जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०२१मधील केरोसीन मागणी
तालुका : केरोसीन पात्र शिधापत्रिका : मासिक मागणी (कि.लीमध्ये)
कागल : ९ हजार ९१७ : ३६
राधानगरी : ६ हजार ९२३ : १२
भुदरगड : ६ हजार ४८८ : २४
गगनबावडा : ३ हजार ९५३ : १२
आजरा : ४ हजार ५३५ : १२
चंदगड : ७ हजार ४९ : १२
-
महिलांचे आरोग्य, श्रम, आणि वेळ या तीनही बाबींचा विचार केला तर गॅसचा वापर अधिक उपयुक्त आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत गॅस कनेक्शन पोहोचावे व कोल्हापूर जिल्हा केरोसिनमुक्त व्हावा यासाठी पुरवठा विभागाकडून सातत्याने सर्वेक्षण केले जात आहे.
दत्तात्रय कविकते (जिल्हा पुरवठा अधिकारी)
--