लोकमत न्यूज नेटवर्क,
पोर्ले तर्फ ठाणे : पोटासाठी स्थलांतरित झालेल्या ऊसतोड मजुर मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून उमेद फौंडेशनने ‘उमेद डी केअर सेंटर’ सुरू करून, मुलांच्यात शैक्षणिक ‘उमेद’ टिकवून ठेवण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता केवळ लोकसहभागातून उमेद फौंडेशन शैक्षणिक चळवळ प्रभावीपणे राबवत आहे. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथे, तर करवीर तालुक्यातील कोपार्डेच्या माळावर ५५ बालक डी केअर सेंटरचा लाभ घेत आहेत.
शाळा सुरू असताना स्थलांतरित मुलांना शाळेत प्रवेश आणि पोषण आहार मिळत होता. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद असल्याने मुले ॲानलाईन शिक्षणाद्वारे शिक्षण घेत आहेत. ऊसतोड मजुरांची मुलं भटक्या कुटुंबापैकी असल्यामुळे ती शिक्षण घेणाऱ्या आश्रमशाळा किंवा वसतिगृहे कोरोनामुळे बंद आहेत. स्थलांतरितमुळे त्यांच्या शिक्षणाबरोबर पोषण आहार बंद आहे. कोरोनामुळे यावर्षी बालकांचे स्थलांतरितचे प्रमाण जादा आहे. अशावेळी त्या मुलांचे कुपोषण होऊ नये, त्यांना योग्य पोषक आहाराबरोबर शिक्षण प्रवाह टिकण्याच्या महत्त्वाकांक्षेतून ‘उमेद’ने लोकसहभागातून ‘उमेद डी केअर सेंटर’ सुरू केले.
आसुर्ले येथील डी केअर सेंटरमधील पोषण आहाराची आणि पोषक कोरड्या खाऊची जबाबदारी दालमिया शुगरने, तर कोपार्डेतील सेंटरमध्ये लोकसहभागातून कोरडा खाऊ देऊन उमेद फौंडेशन बालकांच्यात शैक्षणिक ओढ निर्माण करून आनंददायी शिक्षणाचे धडे गिरवायला लावत आहे.
चौकट
दातृत्वाची गरज..
कोणतीही शासकीय मदत न घेता उमेद फौंडेशन ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांसाठी शैक्षणिक चळवळ आणि वंचितांसाठी सामाजिक उपक्रम राबवत आहे. समाजाने अशा सामाजिक उपक्रमाच्या पाठीशी उभे राहून पाठबळ देणे गरजेचे आहे, तरच उमेद फौंडेशनचा उद्देश सफल होऊन अनेकांच्या जगण्याची उमेद देऊ शकते.
सचिन कुंभार, आसुर्ले प्रकल्प समन्वय
‘शिक्षण आले दारी’चा आदर्श
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ॲानलाईन शिक्षण प्रणाली राबवून शासनाने विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणले. ॲानलाईन शिक्षण पोहोचत नसलेल्या शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागात ‘शिक्षण आले दारी’ हा उमेद फौंडेशनने उपक्रम प्रभावीपणे राबविला. त्या विद्यार्थ्यांना डिजिटल बॅनर, मास्क, सॅनिटायझर आणि वही, पेन यासह शैक्षणिक साहित्यांची मदत आठ महिने केली.