इचलकरंजी : वस्त्रनगरीला डावलून जिल्ह्यात भलतेच राजकारण सुरू आहे. जिल्ह्यातील मंत्री काहीही म्हणू देत, माझी काळजी इतरांनी करू नये. त्यासाठी मी सक्षम आहे. यांच्या श्रेयवादामुळे वस्त्रोद्योगाला भेडसावणारे प्रश्न बाजूला पडत चालले आहे. वस्त्रनगरीला आवश्यक ते सर्वकाही करण्यास मी खंबीर आहे. जनता माझ्या पाठीशी असून कोण कशासाठी काय करत आहे, याची सर्व कल्पना जनतेला आहे, असा टोला आमदार प्रकाश आवाडे यांनी लगावला.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ताराराणी पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार आवाडे बोलत होते. शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी दूधगंगा योजना पूर्ण करायची आहे. वस्त्रोद्योगास ५ टक्के व्याज अनुदान, वीज सवलत, रेशन व्यवस्था मिळण्यासाठी लढा देणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पुढच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज याच्या जयंतीदिनी संभाजी चौकात महाराजांचा पुतळा बसविला जाईल. प्रत्येक अन्यायाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे आणि जोमाने कामाला लागावे, असा आदेशच आमदार आवाडे यांनी दिला.
शहरातील काही नेतेमंडळींमध्ये कोणाच्या कोंबड्याच्या आरवण्याने सूर्य उगवतोय काय हे बघण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पक्षीय कार्यकर्त्यांना बोलवून कार्यक्रम घ्यायचे आणि यातून प्रश्न सुटलाच तर आम्हीच केलं हे दाखवण्याचा प्रकार या राजकीय पक्षाच्या मंडळींचा सुरू आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या आगामी निवडणूक ताराराणी पक्षातर्फे स्वबळावरच लढवायची आहे. याबाबत कोणाशीही चर्चा व आघाडी करायची नाही.
दरम्यान, १ जुलै रोजी ताराराणी पक्षाची कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे. सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असून तो रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेषत : गावभाग, कलावंत गल्ली, तांबेमाळ, जवाहरनगर, शहापूर भागात बाधितांची संख्या जास्त आहे. त्या भागातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोरोनाला थोपवून शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा. आयजीएम हॉस्पिटलमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून त्या मिळवून देणार असल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगितले.