कोल्हापूर : कडकडीत लॉकडाऊनच्या सलग दुसऱ्यादिवशी सोमवारी कोल्हापूर शहर शंभर टक्के बंद राहिले. कोरोना साखळी तोडण्याचा कोल्हापूरकरांनी निर्धार केला असल्याचे मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले. कोणीही नागरिक विनाकारण रस्त्यावर आले नाहीत, तर आपल्यातील जागरुकपणाचे दर्शन घडवित, त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेत प्रशासनाच्या प्रयत्नांना मदत केली.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विस्फोट झाला असून संसर्गाची साखळी तोडण्याकरिता कडकडीत लॉकडाऊनशिवाय पर्याय उरलेला नव्हता. दोन-तीन दिवस आधी जिल्हा प्रशासन असो, की पालकमंत्री सतेज पाटील, की ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ असोत, सर्वांनीच जिल्ह्यातील नागरिकांना कडकडीत लॉकडाऊनची पूर्वकल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे जरुरीचे साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला घेऊन ठेवणे शक्य झाले होते.सोमवारचा दिवस म्हणजे आठवड्याची सुरुवात असते, रस्त्यावर सर्वत्र वर्दळ, नागरिकांची रस्त्यावरील गर्दी, सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, न्यायालये, खासगी आस्थापनांची कार्यालये फुल्ल झालेली असतात. परंतु कालचा सोमवार त्याला अपवाद ठरला. रस्त्यावर, तसेच सरकारी कार्यालयात असे चित्र कोठेच दिसले नाही. एरव्ही भाजी मंडईत झुंबड उडालेली असायची, गोंगाट असायचा. मात्र तेथेही सोमवारी नीरव शांतता होती. पोत्यांनी झाकलेल्या बुट्ट्या, त्यावर प्लास्टिकचे कागद आणि दगड ठेवलेले चित्र पाहायला मिळाले.शहरातील सर्व प्रकारची दुकाने बंद होती. रस्त्यावरील फेरीवाले गायब होते. कोठेही कोणीही चोरून बसून सुध्दा भाजी विक्रीचा प्रयत्न केला नाही. चहाची टपरी नाही की पानाची टपरी सुध्दा कुठे उघडल्याचे दिसले नाही. रस्त्यावर केवळ सरकारी कार्यालयांत, रुग्णालयांत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच काय ती तुरळक वर्दळ होती. बाकी सर्वसामान्य नागरिक कुठेही दिसला नाही. पेट्रोलपंप सुरू होते, परंतु तेथे केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच पेट्रोल देण्याचे बंधन असल्याने त्याठिकाणीही सामसूम होती. दोन दिवसापासून पंप चालकांच्या विक्रीत प्रचंड घट आली आहे.
CoronaVirus Kolhapur : कोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 7:24 PM
CoronaVirus Kolhapur : कडकडीत लॉकडाऊनच्या सलग दुसऱ्यादिवशी सोमवारी कोल्हापूर शहर शंभर टक्के बंद राहिले. कोरोना साखळी तोडण्याचा कोल्हापूरकरांनी निर्धार केला असल्याचे मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले. कोणीही नागरिक विनाकारण रस्त्यावर आले नाहीत, तर आपल्यातील जागरुकपणाचे दर्शन घडवित, त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेत प्रशासनाच्या प्रयत्नांना मदत केली.
ठळक मुद्देकोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद भाजी मंडईत सोमवारी नीरव शांतता