‘गोकुळ’ला दृष्ट लागू देऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:39 PM2024-01-30T12:39:55+5:302024-01-30T12:42:07+5:30
दादांच्या नाराजीनंतर ‘गोकुळ श्री’चे बक्षीस १ लाख
कोल्हापूर : दूध नाशवंत असले तरी हा व्यवसाय नीट केला तर तो अधिक निर्मळ आहे. पण, गैरव्यवस्थापनामुळे महाराष्ट्रातील दूध संघांची वाट लागली असून महाराष्ट्रालाच नव्हे देशाला भूषणावह असे काम करणाऱ्या ‘गोकुळ’ला कोणाची दृष्ट लागू देऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
‘गोकुळ’ दूध संघाच्या हीरक महोत्सव वर्ष समारंभानिमित्त सोमवारी संस्थांना भेटवस्तू वाटप, अद्ययावत लोणी-पेढा प्रकल्प व पेट्रोल पंपाचे भूमिपूजन, ‘गोकुळ श्री’ पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, संस्था नीटपणे चालवल्या नाही तर त्याची जबर किंमत जिल्ह्याला मोजावी लागते. काहींनी जिल्हा बँका चुकीच्या पद्धतीने चालवल्या, त्यांना तुरुंगात जावे लागले. आजही, जिल्हा बँका सरकारच्या हमीशिवाय चालत नाहीत. हे जरी खरे असले तरी ‘कोल्हापूर’, ‘पुणे’ व ‘सातारा’ या जिल्हा बँकांचा कारभार आदर्शवत आहे. ‘गोकुळ’ने धवलक्रांती केली आहे. ‘गोकुळ श्री’ विजेत्यांना कमी बक्षीस देता, तुमच्या खिशातून देता का? माझ्याकडे काम घेऊन येताय, पाच पैसेही न घेता तुमची कामे करतो. मग, तीन क्रमांकासाठी १ लाख , ७५ हजार, ५१ हजार असे बक्षीस यावर्षीपासून करण्याची सूचना अजित पवार यांनी केली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरची माती व पाणीच कसदार असल्याने दुधाला वेगळीच चव आहे. ‘अमूल’ने अनेक प्रयत्न केले, पण त्यांना येथे यश मिळाले नाही.
‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, ज्यांची गाय-म्हैस नाही अशांची तक्रार ऐकून कारवाई करत आहे. वजन काट्यासह दूध अनुदानातील त्रुटी दूर करा. आमदार राजेश पाटील, के.पी. पाटील, संजय घाटगे, ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने आदी उपस्थित होते. अजित नरके यांनी आभार मानले.
‘गोकुळ’मध्ये पहिल्यांदाच आलो
महाविद्यालयीन शिक्षण येथे झाल्याने कोल्हापूरशी माझे नाते वेगळे आहे, अनेक वेळा कोल्हापुरात आलो, पण ‘गोकुळ’मध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग आला. राजकीय जीवनात काम करताना मतभेद असतात, परंतु मनात काही ठेवून काम करायचे नाही. सहकारी संस्थांत राजकारण आणून चालत नसल्याचे पवार यांनी सांगितले.
दादा, आमदारकी नको, पण ‘गोकुळ’ द्या
माझ्याकडे कोल्हापुरातील भेटण्यासाठी आलेले, ‘दादा, आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक पद द्या’, अशी विनंती करतात. याची कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ‘गोकुळ’च्या नोकरीसाठी माझ्याकडे चिठ्ठी मागायला येणाऱ्यांची संख्या कमी नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
दूध अनुदानातील त्रुटींबाबत आज बैठक
दूध अनुदानाच्या निर्णयात काही त्रुटी आहेत. आज, मंगळवारी दुग्ध सचिवांसोबत बैठक लावून त्यातूनही माझ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका घेतली जाईल, असे पवार यांनी सांगितले.
अध्यक्षपदासाठी दादांचा शब्द महत्त्वाचा ठरला
‘गोकुळ’चे दोन वर्षांसाठी अध्यक्ष करण्याचा शब्द नेत्यांनी दिला होता. पण, यामध्ये अजितदादांचा शब्द महत्त्वाचा ठरल्याचे जाहीर वक्तव्य अरुण डोंगळे यांनी केले.
सतेज पाटील यांच्या अनुपस्थितीची चर्चा
या समारंभाला आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, विनय काेरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबीटकर यांच्यासह खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना निमंत्रित केले होते. पण, यापैकी एकही नेता उपस्थित नव्हता, तर शिवसेनेचे (उबाठा) माजी आमदार संजय घाटगे यांची उपस्थिती मात्र चर्चेची ठरली.