कोल्हापूर : आपल्या आगमनाने, चैतन्यदायी अस्तित्वाने, वरदहस्ताने भक्तांमध्ये दुर्दम्य उत्साह, सुख, समृद्धी आणि आनंद आणलेल्या लाडक्या गणपती बाप्पांना, गौराईला निरोप द्यायचा क्षण आज गुरुवारी आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून घराघरातील अबालवृद्धांना आपल्या भक्तीत तल्लीन करून अवघा रंग एक करणाऱ्या देवाला निरोप देताना समस्त कोल्हापूरकरांची मने जड झाली आहेत. येऊ नये असे वाटते, तो निरोपाचा दिवस आज आला आहे. या निमित्त शहरात कोल्हापूर महापालिका, तसेच जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.एक वर्ष वाट पाहिल्यानंतर केवळ पाच दिवसांचा पाहुणा म्हणून आलेले गणराय घरी असतात, तो काळ भारलेला असताे. भक्तिमय आणि प्रसन्न असतो. हे मंगलमयी वातावरण, हे सुख कधी संपूच नये, असे प्रत्येकाला वाटते, पण शेवटी तो क्षण येतोच, जेव्हा लाडक्या गणरायाला निरोप द्यावा लागतो. आज गुरुवारी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशी आळवणी करत कोल्हापूरकर आज गणपती बाप्पांना निरोप देणार आहेत.
राज्यासाठी आदर्शवत असलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा वारसा यंदाही जपत कोल्हापूरकर काहिलींमध्ये श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील चौकाचौकात काहिलींची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह भागाभागातील तरुण मंडळे, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेऊन विसर्जनाची तयारी केली आहे. विसर्जित गणेशमूर्तींचे इराणी खणीत पुन्हा विसर्जन केले जाणार आहे. भागाभागातून गणेशमूर्ती नेण्यासाठी ट्रॉलींची सोय केली आहे. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, गावागावांमध्येही पर्यावरणपूरक विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.
जलाशयांच्या ठिकाणी कुंडाची सोयशहरातील पंचगंगा नदी घाट, रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा तलाव यासह जलाशयांच्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी कुंडांची सोय केली जाणार आहे. स्वयंसेवक व कार्यकर्ते भाविकांना गणेशमूर्ती विसर्जनासाठी मदत करणार आहे. यासह शंभर टक्के निर्माल्य संकलित केले जाणार आहे.कोल्हापुरात २०७ कृत्रिम विसर्जन कुंडघरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महानगरपालिका प्रशासनाने शहरात सर्वत्र २०७ कृत्रिम विसर्जन कुंड तयार केले आहेत. याशिवाय स्वयंसेवी संस्था, मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही विसर्जनाची व्यवस्था केली आहे. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी बारकाईने नियोजन करण्यात आले असून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. घरगुती गणपती विसर्जनाच्या तयारीचा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी बुधवारी आढावा घेतला. महापालिकेत मदत कक्ष सुरुगणपती विसर्जन संदर्भातील मदतीसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मदत कक्ष मंगळवारपासून सुरु करण्यात आले. मदत कक्ष मध्ये ०२३१-२५४५४७३ व मोबाइल नंबर ९९७०७११९३६ या दोन नंबर्सवर नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. कक्षामध्ये गणेश उत्सवाच्या अनुषंगाने स्वच्छता, फांद्या कटींग करणे, घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने माहिती घेणे, कुंडांच्या ठिकाणांची माहिती नागरिकांना मिळणार आहे. आवश्यक ती वाहने गणपतीची मूर्ती नेण्यासाठी उपलब्ध करुन मिळणे व इतर अनुषंगिक मदतीसाठी हा कक्ष सुरु करण्यात आलेला आहे.