कोल्हापूर : स्टेशन रोडवर रेल्वे स्टेशनच्या समोर सुमारे ३० फूट उंच विद्युतखांबावर चढून बसलेल्या मनोरुग्णाने यंत्रणांची तारांबळ उडवली. मंगळवारी (दि. ५) दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी लॅडरच्या मदतीने मनोरुग्णाला खाली उतरवून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. देवव्रत केवात (रा. छत्तीसगढ) असे मनोरुग्णाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यात विटा येथे कॅनॉलच्या बांधकामावर असलेला देवव्रत केवात हा मंगळवारी दुपारी रेल्वे स्टेशन परिसरात रेंगाळत होता. दुपारी दोनच्या सुमारास अचानक तो स्टेशन रोडवरील दुभाजकावर असलेल्या विद्युतखांबावर चढला. ३० फूट उंचावर लटकून त्याने वाचवा... वाचवा असा टाहो फोडला.
हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी धाव घेऊन त्याला खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, 'माझ्या माझे गुंड लागले आहेत. मला वाचवा,' असे म्हणत त्याने खाली उतरण्यास नकार दिला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून लॅडरच्या मदतीने तरुणाला खाली उतरवून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तो मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले.अग्निशामक दलाच्या ताराराणी फायर स्टेशनचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, नवनाथ साबळे, फायरमन विजय सुतार, संभाजी ढेपले यांच्यासह शाहूपुरी पोलिसांनी मनोरुग्णाला खाली उतरवण्याचे काम केले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली.