राजाराम पाटील --इचलकरंजीछोटा-मोठा उद्योग-व्यवसाय करण्यासाठी आणि सहज उपलब्ध होणाऱ्या सुविधेमुळे वस्त्रनगरी आणि परिसरात खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. शासनाने सावकारांच्या अन्याय आणि पिळवणुकीच्या विरोधात सावकारी विरोधी कायदा केला असला तरी त्यांची खाकी आणि गुंडांबरोबर असलेली सलगी, यामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही.इचलकरंजीला सावकारी काही नवीन नाही. अत्यंत किरकोळ स्वरुपात असलेली सावकारी आता बोकाळली असून, तिने आता बड्या उद्योग-व्यवसायातही शिरकाव केला आहे. वसुलीसाठी गुंड आणि त्यातून काही अडचणी निर्माण झाल्यास ‘काही परसेंटवर’ खाकीची मदत घेतली जाते. त्यामुळे सावकारीने आता उग्र स्वरूप प्राप्त केले आहे.इचलकरंजी परिसरामध्ये साधारणत: तीस वर्षांपूर्वी छोटे विक्रेते (फेरीवाले-आठवडा बाजारकरू) निर्माण झाल्यापासून त्यांना व्याजाने रक्कम देण्यासाठी सावकारांची उत्पत्ती झाली. मात्र, त्यावेळी बोटावर मोजण्याइतकीच त्यांची संख्या होती. सुरुवातीला व्याज कपात करून दिलेल्या रकमेची हप्ता पद्धतीने वसुली होत असे. त्यापाठोपाठ कार्ड पद्धती आली. त्यावेळी सावकार स्वत: किंवा एखाद्या हस्तकामार्फत आठवडी बाजारात फिरून वसुली करीत असे. कालांतराने अनेक सावकार निर्माण झाले आणि त्यातील बड्या सावकारांनी मोठ्या उद्योग-व्यवसायात लक्ष घातले. त्यामुळे सावकारीची व्याप्ती वाढली असून, बड्या रकमांच्या वसुलीसाठी गुंड पोसण्याबरोबरच परस्पर वसुलीसाठी खाकीची सुद्धा मदत घेण्यात येते.येथील वर्षा म्हसकर या महिलेने मंडप साहित्य विक्रीच्या व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एका सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी म्हसकर गुरफटत गेले. आणि एका सावकारीच्या परतफेडीसाठी दुसरा अशा पाच सावकारांच्या फेऱ्यात म्हसकर अडकले. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यापाठोपाठच लतीफ मुल्ला यांनी यंत्रमाग व्यवसायासाठी बडा सावकार-बादशहा बागवान यांच्याकडून वीस लाख रुपये घेतले आणि त्याची पठाणी वसुली होत असल्याबद्दल मुल्ला यांनीसुद्धा पोलिसांत धाव घेतली आहे. मुल्ला यांनी वीस लाखांसाठी सव्वीस लाख रुपयांची परतफेड केली. अजूनही त्यांच्याकडे दहा लाख रुपयांच्या मागणीसाठी धमकावले जात आहे. त्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. पतसंस्था बुडाल्यामुळे सावकारकी पुन्हा जोमातखासगी सावकारीचे ‘पठाणी’ व्याज आणि वसुलीतून गोरगरीब जनतेची मुक्तता व्हावी, यासाठी सुमारे २५ वर्षांपूर्वी गावोगावी पतसंस्था स्थापन करण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने प्रोत्साहन दिले. त्याला त्यावेळचे सहकार राज्यमंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. पतसंस्थांमार्फत तळागाळातील माणसांची पत सुधारण्यास मदत केली. सुरुवातीला जोमात असलेल्या पतसंस्थांतील काही संचालकांनी गैरव्यवहार केले. अनेक पतसंस्था बुडाल्याने लोकांचा विश्वास उडाला. मात्र, याला मोजक्या नामांकित पतसंस्थांचा अपवाद आहे. अशा पार्श्वभूमीवर सावकारीने अलीकडे पुन्हा डोके वर काढले आहे.कायदा असूनही निष्प्रभसावकारीच्या विरोधात शासनाने दोन वर्षे कैद व २५ हजार रुपये दंडाच्या तरतुदीचा कायदा केला. परवाना नसेल तर पाच वर्षे कैद व ५० हजार रुपये आणि कोरे बंधपत्र, चिठ्ठी, अन्य कागद घेतल्यास तीन वर्षे कैद व २५ हजार रुपये दंड होऊ शकतो. मात्र, सावकार स्थावर मालमत्ता विक्री, दीर्घ भाडेतत्त्वावर, गहाणवट अशा पद्धतीने राजरोसपणे घेत असूनही त्यांना ‘काय द्याचे बोला’ या रितीमुळे कायद्याचा धाकच राहिला नाही.
गुंड, खाकीच्या जोरावर सावकारीचा जाच
By admin | Published: February 07, 2016 9:04 PM