कोल्हापूर : आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पांचा मुक्काम यंदा सहा दिवस असणार आहे. रविवारपासूनच श्री गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे; त्यामुळे घरोघरी गौरी-गणपती आरासाची तयारी सुरू आहे.गणपती म्हणजे ऐश्वर्य, संपन्नता, सुख आणि समृद्धीची देवता. अकरा दिवसांचा पाहूणा म्हणून घराघरांत विराजमान झालेल्या या देवाच्या उत्सवकाळात सर्वत्र मांगल्याचे वातावरण असते. पाठोपाठ गौरी शंकरोबाही येतात. या परिवार देवतांच्या पूजनात सगळे रममाण होतात.
रोज आरती, धुप-दीप नैवेद्य, प्रसाद याने आयुष्यातील ताणतणाव, संघर्ष विसरून त्यांच्याशी लढण्याची नवी ऊर्जा मिळते. म्हणूनच हा उत्सव सगळ्यांना अधिक प्रिय आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर हा उत्सव साजरा करणार असले, तरी महापुराचे वातावरण निवळण्याचे मोठे काम यातून होणार आहे. यंदा श्री गणेशाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन आणि सहाव्या दिवशी घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे.हरितालिका पूजन (रविवार, दि. १) : पार्वतीने शंकराला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी हरितालिका पूजन केले होते. या दिवशी कुमारिका व सुवासिनी वाळूपासून शंकराची पिंड तयार करतात. फूल-पान वाहून व्रत कथा वाचली जाते. दिवसभर व्रतस्थ राहून गणेशचतुर्थीला उपवास सोडला जातो.गणेशचतुर्थी (सोमवार दि. २) : श्री गणपती बाप्पांच्या आगमनाचा हा दिवस. या दिवशी सकाळपासूनच श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित होते. दुपारनंतर सार्वजनिक मंडळांकडून मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या दिवशी खीर, मोदकसारख्या पंचपक्वानाचा नैवेद्य दाखविला जातो.ज्येष्ठा गौरी आवाहन (गुरुवार, दि. ५) : गणपतीपाठोपाठ आई गौरीचेही घरोघरी आवाहन केले जाते. दारात कलशावर गौरीच्या डहाळ्यांचे पूजन करून डोक्यावर पावलागणिक ती सुखसमृद्धी घेऊन आल्याचे सांगते. गौरी रानावनांत वाढल्याने या दिवशी तिला मिश्र भाज्या वडीचा नैवेद्य दाखविला जातो.गौरीपूजन (शुक्रवार, दि. ६) : या दिवशी गौरीच्या मागे शंकरोबाही येतो. या परिवार देवतांचे पूजन केले जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. सुरेख आरासाची मांडणी होते. सायंकाळी हळदी-कुंकूचा कार्यक्रम केला जातो.गौरी-गणपती विसर्जन (शनिवार, दि. ७) : भक्तांच्या घरी पाच दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर सहाव्या दिवशी घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन करण्यात येईल. या दिवशी सकाळी अनेक घरांत हळदी -कुंकू, दोरक घेणे असे विधी होतात. दुपारनंतर जवळच्या जलाशयाच्या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.