कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांची घरवापसी झाली आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लजमधील काँग्रेसला बळकटी, मोठी ताकद मिळाली आहे. त्यांना आणि कार्यकर्त्यांना योग्य न्याय, सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी येथे दिली.
येथील काँग्रेस कमिटीमध्ये गोपाळराव पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. गेल्या महिन्यात काँग्रेस प्रवेशाबाबत गोपाळराव पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. त्यावर मी परदेशात गेलो. त्यामुळे प्रवेशाचा कार्यक्रम राहिला. त्यावर सुरू झालेल्या राजकीय चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी छोटेखानी कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चंदगडमध्ये मोठा मेळावा घेण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. गट म्हणून नव्हे, तर काँग्रेस म्हणून काम करणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात काँग्रेस वाढीसाठी एकजुटीने कार्यरत राहणार आहे. विकासकामांच्या माध्यमातून पाठबळ द्या, अशी मागणी गोपाळराव पाटील यांनी केली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पाण्णा भोगम, विक्रम चव्हाण, विलास पाटील, लिंगाप्पा आवडण, अंकुश गावडे, अनंत कांबळे, अशोक जाधव, संजय पाटील, विष्णू गावडे, गोविंद पाटील, राहुल खंजिरे, मल्लिकार्जुन मुगेरी, सोमगोंडा आरबोळे, संदीप नांदवडेकर, आदी उपस्थित होते. विद्याधर गुरबे यांनी स्वागत केले. गुलाबराव घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. संभाजीराव देसाई यांनी आभार मानले.
चौकट
तालुक्याच्या विकासासाठी प्रवेश
सन २००९ च्या निवडणुकीनंतर आमचा गट स्वतंत्र झाला आणि आम्ही मोठ्या आशेने भाजपमध्ये प्रवेश केला; पण अपेक्षाभंग झाला. तालुक्यातील काँग्रेसमध्ये पूर्वी गर्दी होती. आता जागा रिकामी झाल्याने आणि तालुक्याच्या विकासासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे गोपाळराव पाटील यांनी सांगितले. कोणतीही अट घालून मी प्रवेश केलेला नाही. चंदगड, आजरा, गडहिंग्लजमध्ये काँग्रेस पक्ष वाढीसाठी एकजुटीने आम्ही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.