कोल्हापूर : स्वामी समर्थ व साईबाबा बोलतात असे भासवून भक्तांकडून फ्लॅट, मठ, राधानगरी येथील गोशाळेसाठी ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबा प्रवीण विजय फडणीस (रा. सिद्धाळा गार्डनमागे, मंगळवार पेठ) याची तसेच गोशाळेच्या नावावर असणारी एकूण चार बँकेतील खाती शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी गोठवली. शिवाय त्यांच्यासोबत अटक केलेली सेवेकरी सविता अनिल अष्टेकर(वय ३५, रा. मंगळवार पेठ) ही महिला गोशाळेच्या संस्थेमध्ये विश्वस्त असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
आपल्या मुखातून स्वामी समर्थ व साईबाबा बोलतात, असे भासवून भोंदूबाबा प्रवीण फडणीस याने भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह सविता अष्टेकर व श्रीधर नारायण सहस्रबुध्दे (५५, रा. फुलेवाडी चौथा बसस्टॉप) या साथीदारांना जुना राजवाडा पोलिसांनी तक्रारीवरून शुक्रवारी अटक केली होती. त्यावेळी त्याने भक्तांची विविध माध्यमातून सुमारे ३ कोटी ९६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे संबंधित तिघांविरुध्द संदीप प्रकाश नंदगावकार यांच्यासह १२ जणांनी केलेल्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. शनिवारी आणखी ८ जणांनी तक्रारी दाखल केल्यामुळे तक्रारदारांची संख्या २० वर पोहोचली आहे.नंदगावकर यांच्यासह सेवेकरीकडून घेतलेल्या पैशातून भोंदूबाबा फडणीस याने मंगळवार पेठेतील मठासह, दोन फ्लॅट व कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे गोशाळेच्या इमारतीवर खर्च केल्याचे दिसून आले आहे. गोशाळेच्या इमारतीवर सुमारे ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. याप्रकरणी भोंदूबाबा फडणीस व गोशाळा संस्थेची विविध चार बँकेत असणारी खाती गोठवण्याचे पत्र देण्यात आले आहे. याशिवाय या मालमत्तेबाबत कोणतेही व्यवहार करण्यात येऊ नयेत. यासाठी उपनिबंधक, महसूल विभाग यांना लेखी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. दरम्यान, अटकेतील सेवेकरी सविता अष्टेकर या गोशाळा संस्थेच्या विश्वस्तपदी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मंगळवार पेठेतील मठाच्या खोल्यामध्ये सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच मठाच्या तपासणीवेळी तलवार सापडली, त्यामुळे त्यांच्यावर बेकायदेशीर हत्यार बाळगल्याचाही गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, कसबा तारळेतील गोशाळा संस्थेमध्ये काही सेवेकरी मोफत सेवा करत असले तरी तेथील गोमूत्र साठवण करून त्याचा गो अर्क काढून विकणारी संस्थाही त्यांनी नोंदणीकृत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.एम.टेक्. झालेला विद्यार्थीही सेवेतया मठात एम.टेक्. शिक्षण झालेला एक विद्यार्थी सेवेकरी असल्याचे आढळले आहे. त्याचे आई-वडील त्याला नेण्यासाठी आले पण त्याने मठातून घरी जाणार नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीसही अवाक् झाले. शिवाय मठात व कसबा तारळेतील गोशाळेत असणाऱ्या एकूण ८ सेवेकऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.