कोल्हापूर : दिग्दर्शकाला त्याला हव्या असणाऱ्या विषयावर चित्रपट काढला, तर त्याला सेन्सॉर मिळणे सध्याच्या वातावरणात तरी मुश्कील आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्याशी सुरू असलेल्या सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शुक्रवारी आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांनी मुक्तसंवाद साधला. यावेळी फिल्म फेडरेशनचे सुधीर नांदगावकर आणि ‘किफ’चे अध्यक्ष चंद्रकांत जोशी उपस्थित होते. गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेला ‘तू आणि इतर’ हा मराठी चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात आला. यावेळी नांदगावकर यांच्या सिनेमा संस्कृती या पुस्तकाचे प्रकाशन निहलानी यांनी केले.
कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मुक्त संवाद साधताना ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी. (छाया : नसीर अत्तार)
गोविंद निहलानी यांनी त्यांचा पहिला चित्रपट शांतता कोर्ट चालू आहे, मराठीत दिग्दर्शीत केला. तसेच विजय तेंडुलकर, अमोल पालेकर, लेखक पानवलकर या मराठी लेखक, कलाकारांसोबत काम केले, असे सांगून आक्रोश, अर्धसत्य आणि आताचा ‘तू आणि इतर’ या सर्व चित्रपटांशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ हे मराठी आहेत, याचा आवर्जून उल्लेख निहलानी यांनी केला.
हिंदी, बंगालीत सत्यजित रे, मृणाल सेन, ऋत्विक घटक यांनी चाकोरीबाहेरचा चित्रपट काढला आणि ‘शांतता कोर्ट चालू आहे’च्या निमित्ताने तो प्रयोग मराठीत प्रथम करून या नवीन प्रवाहाला तरुण पिढीने प्रतिसाद दिला. आताही ‘तू आणि इतर’ या सिनेमाच्या निमित्ताने कुटुंबावर ओढवलेली समस्या त्याने स्वत:च सोडवायची असते, असा संदेश देणारा वेगळा चित्रपट काढला आहे.तुम्हाला तो प्रश्न भिडला, हेच या सिनेमाचे यश आहे, असे ते म्हणाले. ‘तमस’सारख्या दूरदर्शनवरील मालिकेसाठी सर्वप्रथम प्रसारमाध्यमांनीच सहकार्य केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून प्रकरण न्यायालयात गेले; पण कायदा आणि संविधान जोपर्यंत पाठीशी आहे, तोपर्यंत तुम्हाला भिडलेला विषय मांडण्याचे धाडस दाखवायला हवे, असे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.‘तमस’सारखा सशक्त विषय आणि निर्मात्याचे पाठबळ मिळाल्यास तसा विषय पुन्हा हाताळणे शक्य आहे. आज केवळ चित्रपट नाही, तर वेबसिरीजसोबत अनेक दारे नव्या पिढीसमोर खुली आहेत, असेही ते म्हणाले. ‘गांधी’सारखा आंतरराष्ट्रीय चित्रपट परदेशी कलाकार, तंत्रज्ञांसोबत करण्यामध्ये समाधान मिळाले. त्यांची शिस्तबद्धता आणि कामाची पद्धत अनेक अनुभव देऊन गेली, असे ते म्हणाले. नवी पिढी हुशार आहे आणि चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमुळे चित्रपट संस्कृती बहरत आहे, असेही ते म्हणाले.चित्रपटातून समस्येवर उत्तर देणे बंधनकारक नाहीबहुतेक चित्रपटातून मांडलेल्या समस्यांवर उत्तरही दिले गेले असते; परंतु ते बंधनकारक नाही. प्रेक्षकांना विचारास प्रवृत्त करणे हा एक मोठा बदल या माध्यमातून करता येऊ शकतो. ‘तू’ आणि इतर चित्रपटांत सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात आलेल्या एका समस्येवर प्रकाश टाकला आहे; मात्र त्याचे उत्तर प्रेक्षकांवरच सोपवलेले आहे. प्रश्न उपस्थित करणे ही चांगलीच गोष्ट आहे. त्याचे उत्तर काय असेल, असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये निर्माण होण्यातच या चित्रपटाचे यश आहे, असे गोविंद निहलानी म्हणाले. तुमच्या प्रश्नाचे उत्तर दुसरे का देतील, असा प्रश्नही त्यांनी यानिमित्ताने केला.