कोल्हापूर : गोवर-रुबेला लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकाद्वारे ही महिती दिली.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २७ नोव्हेंबर २०१८ पासून ही मोहीम सुरू करण्यात आली. पाहिल्या टप्प्यामध्ये ४००० सत्रांद्वारे एकूण सहा लाखांपेक्षा जास्त मुला-मुलींना लसीकरण करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात आरोग्य संस्था, अंगणवाडी या ठिकाणी नऊ महिने ते सहा वर्षांपर्यंतच्या अंगणवाडी लाभार्थ्यांसाठी बाह्यसंपर्क लसीकरण सत्र सुरू झाले आहे. तसेच या ठिकाणी १५ वर्षांपर्यंतच्या शाळाबाह्य मुलामुलींना व शाळेमध्ये लसीकरण सत्रादिवशी गैरहजर मुलांना लसीकरण करण्यात येणार आहे.अशी २५०० लसीकरण सत्रे जिल्ह्यात सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत घेण्यात येणार आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व सी. पी. आर. हॉस्पिटल येथे दररोज (शासकीय सुट्टी सोडून) सकाळी नऊ ते एक या वेळेत ही सत्रे होतील.
पालकांनी आपल्या शाळेतील गैरहजर विद्यार्थी, आजारी पाल्यांना व इतर कारणांनी लसीकरण होऊ न शकलेल्या सर्व नऊ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना नजीकच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाऊन गोवर-रुबेला लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही सत्रे ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आयोजित केली जाणार आहेत.सर्व लोकप्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय संघटना, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे या कामी सहकार्य लाभत असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले.
स्थलांतरितांसाठी २८१ पथकेऊसतोड, वीटभट्टी, बांधकाम कामगार, रस्त्यांवर काम करणारे यातील लाभार्थ्यांसाठी २८१ खास पथके तयार केली आहेत. सर्व साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, बांधकाम व्यावसायिक, वीटभट्टी मालक यांनी कामगारांच्या मुलांचे गोवर-रुबेला लसीकरण करण्यासाठी कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.