कोल्हापूर जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य अभ्यासक्रमाअंतर्गत यावर्षी बारावीची परीक्षा देण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे एकूण ५१७४९ विद्यार्थ्यांनी, तर सीबीएसई बोर्डाकडे ५५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी रविवारी बैठक घेऊन सीबीएसई परीक्षांबाबत दोन पर्याय राज्यांसमाेर ठेवले आहेत. त्यात महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेणे अथवा परीक्षेचे स्वरूप बदलणे या पर्यायांचा समावेश आहे. त्याबाबत त्यांनी राज्यांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रत्यक्ष न घेता अन्य पर्यायांचा विचार करायला हवा, अशी भूमिका राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे. त्यामुळे परीक्षेच्या पर्यायाबाबत सरकार, शासनाचा एकीकडे विचार सुरू असताना, दुसरीकडे विद्यार्थी मात्र संभ्रमात असल्याची सध्याची स्थिती आहे.
काय असू शकतो पर्याय? बारावीची परीक्षा रद्द करून चालणार नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतींचा वापर करून शासनाने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात.
-डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरू, भारती विद्यापीठ
शैक्षणिक करिअरची सुरुवात खऱ्याअर्थाने बारावीनंतर होते. त्यामुळे ही परीक्षा घ्यावी. सरकारने कोरोना असताना मोठ्या निवडणुका घेतल्या आहेत. प्रत्येक विद्याशाखेचे तीन-चार विषय एकत्रित करून दिवसभरातील दोन ते तीन सत्रात परीक्षा घेता येईल.
-डॉ. बी. एम. हिर्डेकर, शिक्षणतज्ज्ञ.
बेस्ट ऑफ फाईव्ह तत्त्वानुसार विद्याशाखानिहाय विषय निवडून एकूण शंभर प्रश्नांचा एमसीक्यू स्वरूपातील पेपरव्दारे परीक्षा घेता येईल. त्याचे स्वरूप ऑनलाईन अथवा ऑफलाईन असावे.
- संपत गायकवाड, माजी सहाय्यक शिक्षण संचालक.
विद्यार्थी संभ्रमात
पुढील करिअरचा विचार करता, गुणवत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची दक्षता घेऊन ऑफलाईन स्वरूपात आमची परीक्षा घ्यावी. शासनाने लवकर निर्णय घ्यावा.
-प्रगती हिरवे, कणेरीवाडी.
कोरोना वाढत असल्याने कुटुंबियांना आमच्या परीक्षेबाबतची काळजी वाटत आहे. आमची परीक्षा घ्यावी आणि तिचे स्वरूप हे ऑफलाईन असावे.
- शुभम कांबळे, नागाव.
परीक्षा रद्द करण्यात येऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्याच्या पर्यायाचा सरकारने विचार करावा.
- श्रध्दा वारके, लक्षतीर्थ वसाहत.