लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील आयजीएम हॉस्पिटल अद्ययावत करण्यासाठी तसेच आवश्यक उपकरणे, साहित्य व मशिनरी खरेदीसाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिला असून, प्रतिवर्षी ११ कोटींप्रमाणे पाच वर्षांचा निधी आयजीएम हॉस्पिटलसाठी मिळणार असल्याची माहिती आ. प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ. आवाडे म्हणाले, आयजीएम हॉस्पिटल सन २०१६ साली शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले. याठिकाणी हातकणंगले, शिरोळ तालुक्यासह कर्नाटकातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. आयजीएम सर्वसामान्यांसाठी जीवनदायिनी आहे; परंतु सध्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाची औषधे मिळत नाहीत. अजूनही हॉस्पिटलमध्ये अद्ययावत मशिनरीची कमतरता आहे. आयजीएमवर अद्यापही दुजाभाव दाखवला जात आहे. कोरोना काळात रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून नादुरुस्त व्हेंटिलेटर दुरुस्त करून घेतले. मात्र, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने त्या मशिनरी सध्या वापराविना आहेत. हॉस्पिटलमधील ४२ कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढावा, यासंदर्भातही चर्चा केली आहे.
आयजीएमसाठी नेहमी झटत राहणार आहे. राज्यातील एक चांगले हॉस्पिटल करून दाखवणारच आहे. आयजीएमचे प्रश्न चर्चेतून सोडविण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने मदत करण्याची आवश्यकता असल्याचे आ. आवाडे म्हणाले. पत्रकार परिषदेस प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक राजू बोंद्रे, अहमद मुजावर, राजेंद्र बचाटे, आदी उपस्थित होते.
चौकटी
...तर मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करू
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आयजीएम हॉस्पिटलच्या भेटीदरम्यान अनेक आश्वासने दिली. हॉस्पिटलमधील ४२ कर्मचारी कायम करणे, २०० बेडनी हॉस्पिटल सुसज्ज करणे, सीटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देणे. तसेच वस्त्रोद्योगाच्या समस्या मार्गी लावण्यासह विकासासाठी निधी देऊ, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची दोन महिन्यांत स्थापना करण्याचे सांगितले आहे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केल्यास कोल्हापुरात जाऊन त्यांचा जाहीर सत्कार करू, असे आ. आवाडे म्हणाले.