कोल्हापूर : शहरातील विकासकामांना एकदा निधी दिला की त्यावर राज्य सरकारचे कसलेही नियंत्रण असत नव्हते; परंतु आता मात्र राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी एजन्सी नेमून त्यांच्याकडून कामाच्या प्रत्येक टप्प्यावर कामाचा लेखाजोखा घेण्यात येणार आहे. शनिवारी महानगरपालिकेत झालेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच तसे जाहीर केले.
पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी महानगरपालिकेत जाऊन शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सध्या सुरू असलेल्या आणि पुढील काळात सुरू होणाºया विकासकामांचे चित्रफितीद्वारे सादरीकरण करून माहिती दिली. यावेळी सर्व अधिकारी, भाजप-ताराराणी आघाडीचे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते.
एकदा निधी दिला की आपले दायित्व संपले, अशी सरकारची भावना होत होती; पण त्यामुळे कामे रेंगाळतात. खर्च वाढतो. परिणामी ती अर्धवट सोडली जातात; म्हणूनच काम झाले की नाही, निधी योग्य प्रकारे खर्च झाला की नाही याची माहिती घेण्यासाठी खासगी एजन्सी नेमून तिच्याकडून कामांचा लेखाजोखा घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
ही एजन्सी ‘डीपीडीसी’मार्फत नेमणार की राज्य सरकारमार्फत हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. राज्य सरकारशी संबंधित कामांचा आढावा घेण्याकरिता महापालिकेच्या प्रशासनाने मंत्रालयासाठी एक खास अधिकारी नेमावा आणि या अधिकाºयास सोमवार ते बुधवार मुंबईत पाठपुरावा करण्यास सांगावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.नगरोत्थानची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करून नवीन कामांचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना त्यांनी केली. थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण करण्याकरिता दोन स्वतंत्र अधिकारी लवकरच दिले जातील; परंतु ही योजना मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी घ्या, असेही त्यांनी अधिकाºयांना बजावले.बैठकीस महापालिकेच्या सर्व अधिकाºयांसह आमदार अमल महाडिक, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, गटनेते विजय सूर्यवंशी, सुनील कदम, ईश्वर परमार, किरण नकाते, अजित ठाणेकर उपस्थित होते.दादांनी पत्रकारांना टाळलेपालकमंत्री म्हणून प्रथमच महानगरपालिकेत गेलेल्या चंद्रकांतदादांच्या बैठकीकडे पत्रकारांचे विशेष लक्ष होते; परंतु पत्रकारांना या बैठकीपासून दूर ठेवून बैठक संपल्यानंतर माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले; पण बैठक संपल्यानंतर दादा खोलीतून बाहेर पडले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना हाक मारून विनंती केली; पण त्यांनी पत्रकारांकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही. पत्रकारांना टाळत दादा तडक निघून गेले. नंतर आमदार अमल महाडिक यांनी बैठकीतील वृत्तांत सांगितला.अस्वस्थ दादांचे फोनवरील बोलणेबैठक सुरू झाल्यापासून पालकमंत्री पाटील काहीसे अस्वस्थ दिसत होते. अर्ध्या तासाच्या बैठकीत त्यांना पाच ते सहा फोन आले. त्यावर त्यांचे बोलणे सुरू होते. एकदा तर बैठकीतील खुर्ची मागे ढकलून एका कोपºयात ते फोनवर बोलत राहिले. त्यामुळे त्यांचे अर्धे लक्ष फोनकडे, तर अर्धे लक्ष बैठकीतील चर्चेकडे राहिले. फोनवरील बोलण्यानंतर ते अस्वस्थ आणि चलबिचल झाले होते. गडबडीत बैठक संपवून ते निघूनही गेले.२७५ कोटींचा आराखडानगरोत्थान योजनेतून सुरू असलेली रस्त्यांची कामे गेल्या आठ-नऊ वर्षांपासून रखडली आहेत. ती ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, तसेच नवीन रस्ते करण्याकरिता २७५ कोटींचा आराखडा तयार करावा, अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी बैठकीत केली.